जागतिक स्पर्धेसाठी आम्ही सज्ज : ज्वाला
By Admin | Updated: August 2, 2015 01:20 IST2015-08-02T01:20:36+5:302015-08-02T01:20:36+5:30
आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझी आणि अश्विनी पोनप्पाची तयारी चांगल्या पद्धतीने सुरू असून, आम्ही या स्पर्धेसाठी सज्ज आहोत. या स्पर्धेत मानांकन मिळालेली आमची पहिली जोडी

जागतिक स्पर्धेसाठी आम्ही सज्ज : ज्वाला
मुंबई : आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझी आणि अश्विनी पोनप्पाची तयारी चांगल्या पद्धतीने सुरू असून, आम्ही या स्पर्धेसाठी सज्ज आहोत. या स्पर्धेत मानांकन मिळालेली आमची पहिली जोडी असल्याने ही खूप मोठी गोष्ट आहे, असे भारताची दुहेरी गटातील अव्वल महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने सांगितले.
ठाणे येथील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानीया स्कूलच्या बंदिस्त क्रीडाभवनाचे शनिवारी ज्वालाच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी ज्वालाने प्रतिक्रिया दिली. आगामी जागतिक स्पर्धेविषयी अधिक बोलताना ज्वाला म्हणाली की, ‘स्पर्धेतील पहिला सामना आमच्या साठी खूप महत्त्वाचा असेल. अश्विनी आणि माझी केमिस्ट्री चांगली असल्याने आम्ही नक्कीच या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करू, असा विश्वास आहे.’
याव्यतिरीक्त देशातील बॅडमिंटन प्रगतीविषयी ज्वालाने सांगितले की, ‘बॅडमिंटनच्या प्रसारासाठी जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे आहे. प्रत्येक नवोदित खेळाडूला
दर वर्षी कमीत कमी २०-२५ स्पर्धा खेळण्याची संधी मिळायला हवी. आज युवा खेळाडूंना म्हणावी तितकी संधी मिळत नसल्याने, माझ्या
व अश्विनीच्या तुलनेत सध्याच्या
व भविष्यातील खेळाडूंच्या कामगिरीत खूप फरक दिसेल.’ तसेच, बॅडमिंटन मध्ये सुपरपॉवर बनायचे असल्यास यूथटॅलेंट सर्वांसमोर येणे गरजेचे असल्याचेदेखील ज्वालाने सांगितले.
दरम्यान, आॅलिम्पिकनिमित्त भारत सरकारने राबविलेल्या ‘टॉप्स’ योजनेबाबत ज्वालाने अनभिज्ञ असल्याचे सांगितले.
याविषयी ती म्हणाली की, ‘याबाबतीत मला मीडियामधूनच माहिती मिळत आहे. मला आणि अश्विनीला सरकारी मदतीची नितांत गरज आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळे आमच्या वरील दबाव कमी होऊन आम्हाला यशस्वी कामगिरीचा विश्वास मिळेल.’
(क्रीडा प्रतिनिधी)