वॉर्नर, ख्वाजा यांची शतके, आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर
By Admin | Updated: November 6, 2015 02:37 IST2015-11-06T02:37:41+5:302015-11-06T02:37:41+5:30
डेव्हिड वॉर्नरच्या १३व्या आणि उस्मान ख्वाजाच्या पहिल्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने गुरुवारी पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध धावडोंगर

वॉर्नर, ख्वाजा यांची शतके, आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर
ब्रिस्बेन : डेव्हिड वॉर्नरच्या १३व्या आणि उस्मान ख्वाजाच्या पहिल्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने गुरुवारी पहिल्या कसोटीच्या
पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध धावडोंगर उभारण्याकडे वाटचाल केली.
वॉर्नरने २२४ चेंडू टोलवीत १६३ धावा ठोकल्या. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी आॅस्ट्रेलियाने दोन बाद ३८९ अशी मजल गाठली. ख्वाजा १०२, तसेच कर्णधार स्टीव्ह स्मिथ ४१ धावांवर नाबाद होते. स्मिथने यादरम्यान कॅलेंडर वर्षात हजार धावा पूर्ण केल्या. वॉर्नर जेम्स निशामच्या चेंडूवर स्लिपमध्ये रॉस टेलरकडे झेल देत बाद झाला. त्याने २२ चौकार व एक षटकार ठोकला. ही त्याची दुसरी सर्वोच्च खेळी आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या १८० धावा सर्वोच्च आहेत. भारताविरुद्ध पर्थमध्ये तीन वर्षांआधी वॉर्नरने या धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाकडून मॅथ्यू हेडन ३०, मार्क टेलर १९, जस्टिन लेंगर १६ आणि मायकेल स्लेटर १४ या सलामीवीरांनी वॉर्नरपेक्षा अधिक शतके झळकविली आहेत. वॉर्नरने आज ज्यो बर्न्ससोबत १६१, तसेच ख्वाजासोबत १५० धावांची भागीदारी केली. पाक वंशाचा ख्वाजा याने १२३ चेंडूंत पहिले शतक पूर्ण केले. (वृत्तसंस्था)
ख्वाजाचे कारकीर्दीत पहिले शतक
७१ व्या षटकात वॉर्नर बाद झाला तेव्हा आॅस्ट्रेलियाच्या ३११ धावा होत्या. ख्वाजाने कर्णधार स्टीव्हन स्मिथसोबत सावध खेळून शतक गाठले. उस्मानने १३३ चेंडूंत दहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १०२ धावा केल्या. गाबा कसोटीत आॅस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी नोंदविलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. न्यूझीलंडने आज सहा गोलंदाजांचा वापर केला, पण आॅस्ट्रेलियाचा धडाका त्यांना रोखता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
पहिला डाव आॅस्ट्रेलिया दिवसअखेर २ बाद ३८९
जेए बर्न्स - ७१, डेव्हीड वॉर्नर - १६३, उस्मान ख्वाजा - १०२, स्टीव्ह स्मिथ - ४१
गोलंदाजी : टीम साउदी - ६३/१,जेम्स निशाम ३६/१