वेतन वादामुळे वॉल्शचा राजीनामा
By Admin | Updated: October 22, 2014 04:51 IST2014-10-22T04:51:34+5:302014-10-22T04:51:34+5:30
भारतीय हॉकी संघाला तब्बल १६ वर्षांनंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणा-या टेरी वॉल्श यांनी वेतनाच्या वादामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे़

वेतन वादामुळे वॉल्शचा राजीनामा
नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाला तब्बल १६ वर्षांनंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणा-या टेरी वॉल्श यांनी वेतनाच्या वादामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे़ विशेष म्हणजे वॉल्श यांनी भारतामध्ये खेळात असलेल्या नोकरशाहीला जबाबदार ठरविले आहे़
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) संचालक जी़ जी़ थॉमसन यांना लिहिलेल्या पत्रात वॉल्श यांनी म्हटले, की भारतामध्ये खेळात असलेल्या नोकरशाहीमुळे मी पदाचा राजीनामा देत आहे़ खेळात असलेली नोकरशाही भविष्यात भारतीय हॉकी आणि खेळाडूंसाठी घातक ठरू शकते, तसेच संघाला सतत विविध देशांत यात्रा करावी लागत असल्यामुळेही पदाचा त्याग करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे़ आॅस्ट्रेलियात असलेल्या कुटुंबीयांना आता मी जास्तीत जास्त वेळ देऊ इच्छितो़ व्यावसायिक जीवनामुळे माझ्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होत होता़ त्यामुळेही हा निर्णय घेत आहे़ राष्ट्रीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात संधी दिली, त्याबद्दलही वॉल्श यांनी आभार मानले़ हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा म्हणाले, की वेतन वादासह अन्य अनेक मुद्यांवर वॉल्श यांना समस्या होती़ वॉल्श यांचा १९ नोव्हेंबर रोजी करार संपणार आहे़ त्याआधी साई पुन्हा त्यांच्या करारावर चर्चा करू शकते़ जेणेकरून २०१६च्या आॅलिम्पिकपर्यंत ते टीमसोबत कायम राहू शकतील़ साई व वॉल्श यांच्यात बैठक आयोजित करण्याचा सल्लाही बत्रा यांनी दिला आहे़ (वृत्तसंस्था)