वॉल्श बॅक फूटवर
By Admin | Updated: October 23, 2014 00:25 IST2014-10-23T00:25:57+5:302014-10-23T00:25:57+5:30
भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी एक पाऊल मागे टाकताना मंगळवारी दिलेला आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतला आहे़

वॉल्श बॅक फूटवर
नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी एक पाऊल मागे टाकताना मंगळवारी दिलेला आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतला आहे़ भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर वॉल्श यांनी हा निर्णय जाहीर केला आहे़
१६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते; मात्र संघाची वाटचाल योग्य दिशेने सुरूअसताना वॉल्श मंगळवारी वेतनाचे कारण समोर करून प्रशिक्षक पदावरून पायउतार झाले होते़ या राजीनामा नाट्यामुळे हॉकी इंडिया (एचआय) आणि साई यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता़ विशेष म्हणजे वॉल्श यांनी खेळात असलेल्या नोकरशाहीला कंटाळून पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले होते़
साईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत वॉल्श यांच्या सर्व समस्यांचे निदान केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे़ तसेच त्यांच्यासोबत नवीन वेतन करारसुद्धा करण्यात येईल, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे़
वॉल्श यांनी राजीनामा मागे घेतल्यामुळे केंद्रीय क्रीडामंत्री सरबानंद यांनी टिष्ट्वट केले की, साईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर टेरी वॉल्श यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतला याचा आनंद आहे़ निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघ प्रभावी कामगिरी करेल यात शंका नाही़ दरम्यान, या प्रकरणी साईचे महासंचालक जी़ जी़ थॉमसन यांनी सांगितले की, वॉल्श यांची वेतन कराराबद्दल कुठलीही तक्रार नाही; मात्र हाय परफॉरमन्स निदेशकाला निर्णय घेण्यासाठी अधिक स्वातंत्र्य द्यायला हवे, अशी त्यांची मागणी आहे़ टेरी वॉल्श यांनी केलेल्या मागणीला आमचे संपूर्ण सहकार्य आहे, असेही थॉमसन यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)