‘विराट’ रूपाची प्रतीक्षा
By Admin | Updated: October 10, 2014 04:45 IST2014-10-10T04:45:42+5:302014-10-10T04:45:42+5:30
विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सर्व विक्रम मोडीत काढेल, अशी एकवेळ जाणकारांनी शक्यता वर्तविली होती

‘विराट’ रूपाची प्रतीक्षा
नवी दिल्ली : विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सर्व विक्रम मोडीत काढेल, अशी एकवेळ जाणकारांनी शक्यता वर्तविली होती; मात्र सध्या हा स्टार फलंदाज बॅडपॅचमधून जात आहे़ विंडीज विरुद्धच्या पहिल्या वन-डेतही तो फ्लॉप ठरला;मात्र आता पुढच्या वन-डे सामन्यांमध्ये क्रीडाप्रेमींना त्याच्या ‘विराट’ रूपाची प्रतीक्षा आहे़
इंग्लंड दौऱ्यातही विराटला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती़ त्यामुळे विंडीज विरुद्धच्या मायदेशातील वन-डे मालिकेत त्याच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा होती; मात्र पहिल्याच वन-डेत तो अवघ्या दोन धावा काढून तंबूत परतला़ त्याला गत १६ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये १७़०६ च्या सरासरीने केवळ २५६ धावाच करता आल्या आहेत़ त्यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे़
इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील १० डावांमध्ये विराटला १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० असा स्कोअर करता आला होता, तर चार वन-डे सामन्यांत या फलंदाजाची कामगिरी ०, ४०, नाबाद १ आणि १३ धावा अशी झाली होती़ वन-डे मालिका भारताने ३-१ अशी जिंकली असली तरी विराट मात्र सपशेल फ्लॉप ठरला होता़
विराटने जेव्हा भारतीय क्रिकेट संघात एन्ट्री केली होती, तेव्हा त्याने आपल्या प्रभावी खेळाने सर्वांचीच वाहवा मिळविली होती़ त्यामुळे हा फलंदाज सचिनच्याही पुढे निघून जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती;मात्र सध्या विराटचे दिवस फिरले आहेत. तो प्रत्येक धाव काढण्यासाठी झगडताना दिसत आहे़
विराटने आतापर्यंत १३९ वन-डेत देशाचे प्रतिनिधित्व करताना ५०़८० च्या सरासरीने १९ शतके आणि ३० अर्धशतकांसह ५६९० धावा बनविल्या आहेत़ या अनुभवी खेळाडूने आपले अखेरचे शतक यावर्षी २६ फेब्रुवारीला बांगलादेशाविरुद्ध झळकावले होते; मात्र त्यानंतर हा खेळाडू कसोटी आणि वन-डेत सतत फ्लॉप ठरत आहे़ त्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे़ (वृत्तसंस्था)