विष्णू वर्धन दुस-या फेरीत
By Admin | Updated: October 21, 2014 02:46 IST2014-10-21T02:46:28+5:302014-10-21T02:46:28+5:30
भारताच्या विष्णू वर्धनने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत ५० हजार डॉलर एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पहिल्या फेरीत बेल्जियमच्या यान्निक रावटरचा पराभव करून दुस-या फेरीत प्रवेश केला.

विष्णू वर्धन दुस-या फेरीत
पुणे : भारताच्या विष्णू वर्धनने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत ५० हजार डॉलर एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पहिल्या फेरीत बेल्जियमच्या यान्निक रावटरचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत ६१९व्या स्थानावर असलेल्या भारताच्या विष्णू वर्धन याने बेल्जियमच्या यान्निक रावटरचा टायब्रेकमध्ये ७-६ (५), ६-७(६), ६-३ असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. उत्कंठावर्धक झालेल्या या लढतीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या विष्णू वर्धनने जागतिक क्रमांक ३३९ व्या असलेल्या यान्निक रावटरचे आव्हान तीन सेटमध्ये मोडीत काढले. हा सामना सुमारे २ तास ३५ मिनिटे चालला.
पहिल्या सेटमध्ये विष्णू वर्धन यान्निक रावटरविरुद्ध ५-२ अशा फरकाने आघाडीवर होता. पण, यान्निकने सामन्यात पुनर्आगमन करत आक्रमक व चतुराईने खेळ केला व पहिल्या सेटमध्ये बरोबरी साधली. त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये विष्णूने वरचढ खेळाचे प्रदर्शन करत हा सेट ७-६ (५) असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या र्व्हिस राखल्या व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये यान्निकने चलाखीने खेळ करत हा सेट ७-६ (६) असा जिंकला व सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये विष्णूने आपले वर्चस्व राखत यान्निकची तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट ६-३ असा जिंकून सामन्यात विजय मिळवला.
(क्रीडा प्रतिनिधी)