वीरेंद्र सेहवागचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
By Admin | Updated: October 20, 2015 15:40 IST2015-10-20T15:30:20+5:302015-10-20T15:40:27+5:30
तडाखेबाज फलंदाजीने गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण करणारा भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

वीरेंद्र सेहवागचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - तडाखेबाज फलंदाजीने गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण करणारा भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारली आहे. मंगळवारी भारतात परतल्यावर सेहवागने औपचारिकरित्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याचे जाहीर केले.
सोमवारी दुबईतील एका कार्यक्रमात वीरेंद्र सेहगावने निवृत्तीचे दिले होते. मंगळवारी भारतात परतल्यावर सेहवागने ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारत असून मला दिलेला पाठिंबा आणि प्रेम यासाठी सर्वांचे आभार असे ट्विट त्याने केले आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर १९९९ मध्ये मोहाली येथील पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सेहवागला भारतीय संघात संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात सेहवाग अवघ्या एक धावा करुन तंबूत परतला. पदार्पण अयशस्वी ठरले असले तरी त्यानंतर मात्र सेहवागच्या कारकिर्दीचा आलेख उंचावतच गेला. सेहवागने १०४ कसोटी सामन्यांमध्ये ४९. ३४ च्या सरासरीने ८,५८६ धावा केल्या आहेत. तर २५१ वन डे सामन्यात सेहवागने ३५.०५ च्या सरासरीने ७,९२९ धावा केल्या आहेत. टी - २० त सेहवागने १९ सामन्यांमध्ये ३९४ धावा केल्या आहेत.
फॉर्म गमावल्याने सेहवागला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेहवाग शेवटचा कसोटी सामना खेळला होता. कसोटीत दोन वेळा त्रिशतक व चार वेळा व्दिशतक ठोकण्याचा विक्रम त्याने रचला असून २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या वन डेत सेहगावने २१९ धावांची तुफानी खेळी खेळली होती.