विराटचा नवा विक्रम, आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा
By Admin | Updated: May 17, 2016 08:04 IST2016-05-17T08:04:31+5:302016-05-17T08:04:31+5:30
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या एका मोसमातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

विराटचा नवा विक्रम, आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - भन्नाट फॉर्ममध्ये असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या एका मोसमातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मॅचविनिंग नाबाद ७५ धावांची खेळी करणा-या विराटने संघसहकारी ख्रिस गेलचा ७३३ धावांचा विक्रम मोडला.
विराट आणि गेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून एकत्र खेळतात. २०१२ च्या आयपीएलच्या मोसमात गेलने १४ डावांमध्ये ७३३ धावा केल्या होत्या. त्यानंतर लगेच पुढच्यावर्षी चेन्नई सुपर किंग्जच्या मायकल हसीने तितक्याच ७३३ धावा करुन या विक्रमाची बरोबरी केली होती. हसीने १७ डावांमध्ये ७३३ धावा केल्या.
विराटने दोघांपेक्षा सरस कामगिरी करत फक्त १२ डावांमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली. कोहलीने या मोसमात तीन शतके झळकवली आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. शनिवारी गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करताना त्याने आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणा-या भारतीय फलंदाजाचा विक्रम मोडला होता.
२०१४ मध्ये रॉबिन उथाप्पाने कोलकाताकडून खेळताना ६६० धावा केल्या होत्या. तो विक्रम विराटने मोडला. सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता विरुद्ध ५१ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी करुन संघाच्या विजयात त्याने महत्वाची भूमिका बजावली.
आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली ७५२ (२०१६)
ख्रिस गेल ७३३ (२०१२)
मायकल हसी ७३३ (२०१३)
ख्रिस गेल ७०८ (२०१३)
रॉबिन उथाप्पा ६६० (२०१४)
विराट कोहली ६३४ (२०१३)