विराटचा डबल धमाका !
By Admin | Updated: July 23, 2016 10:21 IST2016-07-23T05:20:20+5:302016-07-23T10:21:31+5:30
कर्णधार विराट कोहली नाबाद द्विशतकी खेळी व आर. अश्विनच्या खणखणीत शतकाच्या जोरावर भारताने विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यावर वर्चस्व मिळवले.

विराटचा डबल धमाका !
अॅन्टिग्वा : विराट कोहलीची विक्रमी द्विशतकी खेळी आणि रविचंद्रन अश्विनने (नाबाद १०६) कारकीर्दीतील झळकावलेले तिसरे शतक याच्या जोरावर भारताने विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यावर वर्चस्व मिळवले आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारताने ६ बाद ५१२ धावांची मजल मारली होती. त्यावेळी शतकवीर अश्विनला अमित मिश्रा (२३) साथ देत होता. कोहलीने अश्विनच्या साथीने पाचव्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी केली. अश्विनच्या शतकी खेळीत
१२ चौकारांचा समावेश आहे.
उपाहारानंतर कोहली (२००) पहिल्याच षटकात बाद झाला. त्याला शेनोन ग्रॅबियलने क्लिन बोल्ड केले. कोहलीने उपहारापूर्वी द्विशतक साकारले होते. त्यानंतर त्याला वैयक्तिक धावसंख्येत भर घालता आली नाही. कोहलीने २८३ चेंडूंना सामोरे जाताना २४ चौकार ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये वैयक्तिक २०० धावांवर बाद होणारा तो जगातील आठवा फलंदाज ठरला. यापूर्वी इंग्लंडचा वॉली हेमंड, पाकिस्तानचा मोहसिन खान, आॅस्ट्रेलियाचा डेव्हिड बुन आणि स्टिव्ह वा, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ आणि बांगलादेशचा मुशफिकुर रहीम वैयक्तिक २०० धावांवर बाद झाले आहेत. यापूर्वी कोहलीने अनेक विक्रम पादाक्रांत केले. कोहली बाद झाल्यानंतर अश्विनने वृद्धिमान साहाच्या (४०) साथीने सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी, गुरुवारी चहापानानंतर कोहलीने अजिंक्य रहाणेसोबत (२२) ५७ धावांची भागीदारी केली. या दोघांनी २०० धावा फळ्यावर लावल्या. रहाणेने बिशूच्या चेंडूवर खराब फटका मारल्यावर मिडविकेटवर डेरेन ब्राव्हो याने त्याचा झेल टिपला. त्यानंतर कोहलीने यष्टिरक्षक रिद्धिमान सहाऐवजी अश्विनला फलंदाजीत बढती देण्याचा निर्णय घेत अनेकांना धक्का दिला. अश्विन कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवीत नाबाद राहिला.
- भारतीय कर्णधार विराट कोहलीने अॅन्टिग्वा कसोटी विंडीजविरुद्ध शुक्रवारी द्विशतकी (२००) खेळी केली.
विदेशात द्विशतकी खेळी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. विराटने शुक्रवारी माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा (१९९० मध्ये आॅकलंड येथे १९२ धावा) विक्रम मोडला.
विराटने अॅन्टिग्वा कसोटीत २८३ चेंडूंना सामोरे जाताना २४ चौकारांच्या सहाय्याने २०० धावा फटकावल्या.
यापूर्वीची त्याची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी १६९ धावांची होती. ही खेळी
त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध आॅस्ट्रेलियात साकारली होती.
कर्णधार म्हणून द्विशतकी खेळी करणारा तो भारताचा पाचवा कर्णधार ठरला. यापूर्वी एम.ए.के. पतोडी (इंग्लंडविरुद्ध नाबाद २०३), सुनील गावसकर (विंडीजविरुद्ध २०५), सचिन तेंडुलकर (न्यूझीलंडविरुद्ध २१७) आणि महेंद्रसिंग धोनी (आॅस्ट्रेलियाविरुद्ध २२४) यांनी अशी कामगिरी केली आहे. या सर्वांनी द्विशतकी खेळी मायदेशात साकारली आहे.
विंडीजमध्ये द्विशतकी खेळी करणारा विराट भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सुनील गावसकर,
दिलीप सरदेसाई, नवज्योतसिंग सिद्धू आणि वसीम जाफर यांनी द्विशतकी खेळी केली आहे.
>फलंदाजांना कामगिरी सुधारण्यासाठी कर्णधाराचे प्रोत्साहन हवे असते. कोहली आणि कुंबळे यांचे प्रोत्साहन माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. कोहलीच्या पाठिंब्यामुळे माझ्या आत्मविश्वासात भर पडली. यामुळे डावाचा प्रारंभ करताना न डगमगता खेळू शकलो. लोकेश राहुलऐवजी कोहलीने मला संधी देत मोठ्या मनाचा परिचय दिला आहे.
- शिखर धवन
- बँटिंग पिच असल्याने संयम बाळगणे योग्य : बिशू
येथील सर विव्हियन रिचर्ड स्टेडियमच्या फलंदाजांसाठी पूरक असलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजांना संयम पाळूनच मारा करणे योग्य ठरत असल्याचे मत वेस्ट इंडीजचा लेग स्पिनर देवेंद्र बिशू याने व्यक्त केले.
पहिल्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताचे तीन गडी बाद करणारा बिशू म्हणाला, ‘ही खेळपट्टी फलंदाजांना पूरक आहे. गोलंदाज या नात्याने जितका जास्त संयम पाळता येईल तितकेच हितावह ठरेल. पहिल्या दिवशी खेळपट्टीपासून लाभ मिळत नाही, पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी येथे चेंडू वळण घेतील, असा माझा अंदाज आहे.’
भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीचा लाभ घेतल्याचे सांगून बिशू पुढे म्हणाला, ‘आम्ही सलगपणे शिस्तबद्ध मारा करण्यात
अपयशी ठरलो, पण टप्प्याटप्प्याने चांगला मारा केला. सामना आमच्या बाजूने वळविण्यासाठी आम्हाला अधिक संयम बाळगण्याची गरज आहे.’
>धावफलक
भारत पहिला डाव : मुरली विजय झे. ब्रेथवेट गो. गॅब्रियल ७, शिखर धवन पायचित गो. बिशू ८४, चेतश्वर पूजारा झे. ब्रेथवेट गो. बिशू १६, विराट कोहली त्रिफळा गो. गॅब्रियल २००, अजिंक्य रहाणे झे. ब्राव्हो गो. बिशू २२, रवीचंद्रन अश्विन नाबाद १०६, वृध्दीमान साहा यष्टिचित गो. क्रे. ब्रेथवेट ४0, अमित मिश्रा नाबाद २३, अवांतर : १४, एकूण : १५४ षटकांत ६ बाद ५१२ धावा. गडी बाद क्रम : १/१४, २/७४, ३/१७९, ४/२३६, ५/४०४, ६/४७५. गोलंदाजी : गॅब्रियल २०-५-६१-२, होल्डर २४-४-८३-०, कार्लोस ब्रेथवेट २२-५-६७-०, चेज ३४-३-१०२-०, बिशू ४३-१-१६३-३, क्रेग ब्रेथवेट ११-१-२८-१.