विराटला बरेच शिकावे लागेल : व्हॉटमोर
By Admin | Updated: March 13, 2015 00:50 IST2015-03-13T00:50:24+5:302015-03-13T00:50:24+5:30
राष्ट्रीय संघात प्रवेश केल्यापासून सातत्याने चांगली कामगिरी करून स्वत:ची क्षमता ओळखणाऱ्या विराट कोहलीला आणखी बराच पल्ला गाठावा लागेल

विराटला बरेच शिकावे लागेल : व्हॉटमोर
आॅकलंड : राष्ट्रीय संघात प्रवेश केल्यापासून सातत्याने चांगली कामगिरी करून स्वत:ची क्षमता ओळखणाऱ्या विराट कोहलीला आणखी बराच पल्ला गाठावा लागेल, असे मत झिम्बाब्वेचे कोच डेव्ह व्हॉटमोर यांनी भारतीय उपकर्णधाराबाबत व्यक्त केले आहे.
कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी करिअर सुरू केले, त्या वेळी व्हॉटमोर हे भारताच्या १९ वर्षे संघाचे कोच होते. शनिवारी भारत झिम्बाब्वेविरुद्ध खेळेल. कोहलीने धावा काढू नयेत, यासाठी डावपेच आखण्याचे काम व्हॉटमोर यांना करावे लागेल. संघाचा सराव आटोपल्यानंतर मीडियाशी बोलताना व्हॉटमोर म्हणाले, ‘‘कुठल्याही युवा खेळाडूंसारखे कोहली आणि विराट यांच्याकडे बघितल्यास त्यांचा खेळ विकसित झाल्याचे ध्यानात येईल. काही वेळ त्यांच्यासोबत होतो. या दोन्ही खेळाडूंमध्ये वरची पातळी गाठण्याची क्षमता असल्याचे माझ्या त्या वेळी लक्षात आले होते.’’
१९ वर्षे संघात असल्यापासूनच कोहलीचा आक्रमकपणा मी पाहतो आहे. हा त्याच्यातील आत्मविश्वासाचा भाग असल्याचे व्हॉटमोर यांनी स्पष्ट केले. कोच या नात्याने व्हॉटमोर यांचा भारताविरुद्ध रेकॉर्ड चांगला राहिला आहे. १९९६मध्ये भारताला दोन वेळा नमविणाऱ्या आणि विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे कोच व्हॉटमोर होते. झिम्बाब्वे संघ या स्पर्धेतून आधीच बाहेर पडला आहे. यावर व्हॉटमोर म्हणाले, ‘‘माझा संघ बाद फेरी गाठू शकला नाही ही पहिलीच वेळ आहे.’’ सध्याच्या भारतीय संघाबाबत ते म्हणतात, ‘‘सध्याचा संघ मागील संघाच्या तुलनेत सरस आहे. सध्या भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करीत असल्यामुळे अधिक लाभ मिळाला. फलंदाजीबाबात न बोललेले बरे. भक्कम गोलंदाजीची संघाला गरज होती आणि ती विश्वचषकात ऐन वेळी मिळाली.’’ (वृत्तसंस्था)