विराटने नवाब पतौडी, गावसकर यांना गाठले
By Admin | Updated: October 5, 2016 04:05 IST2016-10-05T04:05:40+5:302016-10-05T04:05:40+5:30
सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत कर्णधार म्हणून विराट कोहलीने नवाब पतौडी व सुनील गावसकर यांची बरोबरी केली

विराटने नवाब पतौडी, गावसकर यांना गाठले
नवी दिल्ली : सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत कर्णधार म्हणून विराट कोहलीने नवाब पतौडी व सुनील गावसकर यांची बरोबरी केली. कोलकाता येथे न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
या शानदार विजयासह भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आला. शिवाय, घरच्या मैदानावर झालेल्या २५०व्या कसोटी सामन्यातही बाजी मारली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोहलीने कर्णधार म्हणून नऊ सामने जिंकण्याची पतौडी व गावसकर यांची बरोबरी केली. नवाब पतौडी यांनी आपल्या नेतृत्वाखाली ४० कसोटी खेळताना ९ सामने जिंकले, तर १९ पराभव व १२ सामने अनिर्णित राखले. तसेच, गावसकर यांनी ४७ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व करताना ९ सामने जिंकले असून, ८ सामन्यांत पराभव व ३० सामने अनिर्णित राखले आहेत. त्याचवेळी कोहलीने आतापर्यंतच्या आपल्या लहानशा कारकिर्दीमध्ये १६ सामन्यांत नेतृत्व करताना नऊ विजय मिळवताना दोन पराभव व पाच अनिर्णित अशी कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे, सर्वाधिक सामने जिंकणारा यशस्वी भारतीय कर्णधार म्हणून कोहली संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहे. तसेच, इंदोर येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बाजी मारून पतौडी व गावसकर यांना पिछाडीवर टाकण्याची संधी कोहलीकडे आहे. (वृत्तसंस्था)
दरम्यान, कोहलीच्यापुढे मोहम्मद अझरुद्दिन (४७ पैकी १४ विजय), सौरभ गांगुली (४९ पैकी २१) आणि महेंद्रसिंह धोनी (६० पैकी २७) आहेत.