विराट कोहलीचा बळी महत्त्वपूर्ण : धोनी
By Admin | Updated: May 6, 2015 02:52 IST2015-05-06T02:51:42+5:302015-05-06T02:52:02+5:30
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने विजयाचे श्रेय गोलंदाजांना देताना या सामन्यात विराट कोहली याचा बळी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

विराट कोहलीचा बळी महत्त्वपूर्ण : धोनी
चेन्नई : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील रॉयल चैलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात २४ धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने विजयाचे श्रेय गोलंदाजांना देताना या सामन्यात विराट कोहली याचा बळी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.
बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली याला ड्वेन ब्रावो याने धावचीत केले होते. त्यामुळे विराट आपल्या अर्धशतकासून वंचित राहिला. त्याने ४४ चेंडंूत दोन चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने ४८ धावा केल्या. विराट जोपर्यंत मैदानावर होता, तोपर्यंत बंगळुरू संघ विजयाबाबत आश्वस्त होता. मात्र, तो बाद झाल्यानंतर या संघाचे एक-एक खेळाडू बाद होत गेले.
धोनी म्हणाला विराट आणि एबी डिव्हिलियर्स खेळत असताना आम्हाला पराभवाची भीती होती. त्यामुळेच विराटचा बळी महत्त्वपूर्ण होता. तो बाद होताच विजय आवाक्यात आला. त्याचे श्रेय गोलंदाजांना जाते. ब्रावोने विराटला ज्या पद्धतीने बाद केले तो क्षण उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गारही धोनीने काढले. त्याच्या नृत्याच्या शैलीने मनोरंजन होत असल्याचे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)