विराट कोहलीच्या कारकिर्दीतील वाईट दिवस
By Admin | Updated: February 24, 2017 16:55 IST2017-02-24T16:55:36+5:302017-02-24T16:55:36+5:30
ऑस्ट्रलिया-भारत दरम्यान सुरू असलेल्या पुणे कसोटीचा दुसरा दिवस कोहलीसाठी आतापर्यंत भारतात खेळलेल्या कसोटींपैकी सर्वात वाईट दिवस

विराट कोहलीच्या कारकिर्दीतील वाईट दिवस
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 - भारताचा स्टार खेळाडू आणि संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. कोहलीचा गेल्या दोन वर्षांपासून असलेला भन्नाट फॉर्म हा देखील त्याला कारणीभूत आहे. मात्र, ऑस्ट्रलिया-भारत दरम्यान सुरू असलेल्या पुणे कसोटीचा दुसरा दिवस कोहलीसाठी आतापर्यंत भारतात खेळलेल्या कसोटींपैकी सर्वात वाईट दिवस होता. कोहलीच्या संघानेही या सामन्यात कांगारूंसमोर नांग्या टाकल्या. पहिल्या डावात केवळ 105 धावा करून भारताचा संघ गारद झाला.
या सामन्यात एकही धाव न काढता कोहली बाद झाला. भारतातील कसोटीमध्ये शून्यावर बाद होण्याची कोहलीची कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ ठरली. कांगारूंचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कच्या षटकात दुस-याच चेंडूवर कोहलीने ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा नाहक प्रयत्न केला आणि कट लागून उडालेला झेल स्लिपमध्ये उभ्या असलेल्या हॅंड्सकॉम्बने टिपला. अशाप्रकारे विराट आणि स्टार्कमधील पहिला सामना मिचेल स्टार्कने जिंकला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारात शून्यावर आऊट होण्याची नामुष्की कोहलीवर 104 डावांनंतर आली. यापुर्वी 2014 मध्ये इंग्लंड मालिकेत कोहली शून्यावर बाद झाला होता. या मालिकेत तो 15 डावांमध्ये 3 वेळेस शून्यावर बाद झाला होता. कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोहली 5 वेळेस शून्यावर बाद झाला आहे.