विराट कोहलीचे आरोप म्हणजे निव्वळ मूर्खपणा - स्मिथ
By Admin | Updated: March 15, 2017 18:27 IST2017-03-15T18:27:26+5:302017-03-15T18:27:26+5:30
वारंवार फसवणूक केल्याच्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचा दावा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने केला आहे.

विराट कोहलीचे आरोप म्हणजे निव्वळ मूर्खपणा - स्मिथ
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 15 - डीआरएसचा कौल घेताना वारंवार फसवणूक केल्याच्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचा दावा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने केला आहे. कोहलीचा आरोप म्हणजे मूर्खपणा असल्याचे स्मिथने म्हटले आहे. दुस-या बंगळुरु कसोटीत पंचांनी बाद ठरवल्यानंतर स्मिथ डीआरएसच्या आधारे पंचांच्या निर्णया विरोधात दाद मागण्यासाठी ड्रेसिंगरुमकडे विचारणा करताना दिसला होता.
सामना संपल्यानंतर विराटने स्मिथच्या या कृतीवर जोरदार टीका केली. माझ्या दृष्टीकोनातून विराटने केलेले आरोप चुकीचे आहेत. सामना संपल्यानंतर मी माझी चूक मान्य केली होती. अशा प्रकारे ड्रेसिंगरुमकडे पाहून विचारणे माझी चूक होती असे स्मिथ सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकारपरिषदेत म्हणाला. मी वारंवार डीआरएससाठी ड्रेसिंगरुमकडे पाहून विचारणा करत होतो. हा आरोपच मूर्खपणाचा आहे. विराटने चुकीचे स्टेटमेंट केले आहे असे स्मिथ म्हणाला.
आज पत्रकारांशी वार्तालाप करताना विराटने कटू आठवणी मागे सोडून पुढे जाणार असल्याचे सांगितले पण ऑस्ट्रेलियन कर्णधारावर केलेल्या आरोपांबद्दल अजिबात खंत वाटत नसल्याचे कोहलीने सांगितले. दुस-या कसोटी सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वादावादीच्या घटना घडल्या. पण आयसीसीने कोणावरही कारवाई केली नाही. मी सामनाधिकार रिची रिचर्डसन आणि अन्य पंचांसोबत चर्चा केली.
कसोटी मालिकेत क्रिकेट जिंकणार असल्याचे त्यांनी मला सांगितले. दोन्ही संघांना नियमांच्या चौकटीत राहून खेळण्याचा सल्ला दिला आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका नेहमी कडवेपणाने खेळल्या जातात असे स्मिथ म्हणाला. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दीक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. 2008 सालच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंडसमध्ये घडलेले मंकीगेट प्रकरण आजही अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजे आहे. दुस-या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डीआरएसच्या वापरावरुन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथवर केलेल्या गंभीर आरोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे.