विराट कोहलीने गाजविले वर्ष
By Admin | Updated: December 27, 2015 02:35 IST2015-12-27T02:35:30+5:302015-12-27T02:35:30+5:30
भारतीय क्रिकेट संघाला २0१५मध्ये चढ-उताराचा सामना करावा लागला, महेंद्रसिंह धोनी नावाचा सूर्य मावळतीकडे झुकत चालला असताना, विराट कोहलीने आपले नेतृत्वगुण प्रथमदर्शीतरी

विराट कोहलीने गाजविले वर्ष
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला २0१५मध्ये चढ-उताराचा सामना करावा लागला, महेंद्रसिंह धोनी नावाचा सूर्य मावळतीकडे झुकत चालला असताना, विराट कोहलीने आपले नेतृत्वगुण प्रथमदर्शीतरी सिद्ध केल्याचे दिसत आहे. धोनीकडून त्याला कर्णधारपदाची सूत्रे मिळाल्यानंतर, कोहलीने श्रीलंकेत आणि मायदेशात कसोटी मालिका जिंकून दिली. दरम्यान, जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर शशांक मनोहर यांच्याकडे बीसीसीआयची सूत्रे आली आहेत. बीसीसीआयमधील ‘स्वच्छता मोहीम’ हाही यंदा चर्चेचा विषय ठरली आहे.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर अचानक निवृत्ती पत्करली. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिल्लीच्या विराट कोहलीच्या खांद्यावर आली. पहिल्या टप्प्यात तरी तो या कसोटीवर पास झाल्याचे दिसत आहे.
चार सामन्यांच्या या मालिकेत खेळपट्टीबद्दलची चर्चा चांगलीच रंगली. मोहाली आणि नागपूर येथील सामने तिसऱ्याच दिवशी संपले. या मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेची अक्षरश: शिकार केली. याबद्दल नागपूर स्टेडीयमला आयसीसीकडून ‘अधिकृत समज’ही देण्यात आली आहे.
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी या मालिकेत सुपर हिट ठरली. परंतु, भारतीय जलदगती गोलंदाज प्रभाव टाकू शकले नाहीत. इशांत शर्मा काही अंशी यशस्वी ठरला, परंतु त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हते. वर्ल्डकपमध्ये भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचविण्यास महत्त्वपूर्ण कामगिरी करणारा मोहम्मद शमी जवळ जवळ वर्षभर मैदानाबाहेरच राहिला.
विश्वचषकाचा मुकुट पुन्हा आपल्याकडेच ठेवण्याच्या इराद्याने धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने सेमीफायनलपर्यंत सुसाट धडक मारली, पण तेथे आॅस्ट्रेलियाकडून
पराभूत झाल्यामुळे त्यांचा फायनलचा मार्ग बंद झाला. मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखालील कांगारू संघाने न्यूझीलंडला हरवून पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकपनंतर मायकेल क्लार्क, मिशेल जॉनसन, डॅनिएल व्हिट्टोरी यांनी निवृत्तीची घोषणा केली. (वृत्तसंस्था)
कोहलीने श्रीलंका दौऱ्यात कसोटी कर्णधार म्हणून पहिल्यांदा पूर्णवेळ जबाबदारी सांभाळली. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळविला. श्रीलंकन भूमीवर भारताने २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली.
कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मायदेशात कसोटीतील नंबर वन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ३-0 ने जिंकून इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेचा परदेशात हा ९ वर्षांनंतर पहिला मालिका पराभव ठरला.