विराट कोहलीनं भलत्याच पत्रकाराला वाहिली शिव्यांची लाखोली
By Admin | Updated: March 3, 2015 19:02 IST2015-03-03T18:56:01+5:302015-03-03T19:02:09+5:30
विराट कोहलीने पत्रकारांना शिवीगाळ केली असून त्यामुळे तो वादाच्या भोव-यात अडकला आहे.

विराट कोहलीनं भलत्याच पत्रकाराला वाहिली शिव्यांची लाखोली
ऑनलाइन लोकमत
पर्थ (ऑस्ट्रेलिया), दि. ३ - भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने पत्रकारांना शिवीगाळ केली असून त्यामुळे तो वादाच्या भोव-यात अडकला आहे. क्रिकेट व्यतिरिक्त कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असलेला कोहली गरम डोक्याचा असून त्याने जरा सबुरीनं वागावं असा सल्ला टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी दिला आहे. कोहलीकडे भावी कप्तान म्हणून बघितलं जात असताना त्याला असं लागणं शोभत नसल्याचं शास्त्रींनी सांगितल्याचं समजतं.
वेस्ट इंडिजशी होणा-या मुकाबल्याआधी कोहली व अन्य खेळाडू सराव करत होते. त्यावेळी ड्रेसिग रूममध्ये परतताना अचानक कोहली गरम झाला आणि त्याने जवळच असलेल्या भारतातल्या एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराला शिवीगाळ केली. त्या पत्रकारासाठी हा धक्काच होता, कारण कुठलाही संदर्भ नसताना कोहलीनं त्याच्यावर अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करत अपशब्दांचा भडीमार केलेला होता. कोहलीसोबतच्या अनेक खेळाडुंनाही कोहली का भडकला हे समजलं नाही. त्यानंतर, असं लक्षात आलं कोहली व त्याची मैत्रिण अनुष्का शर्माबाबत काही मजकूर त्याच्या वृत्तपत्रात छापून आला होता आणि तो लिहिणारा पत्रकार हाच अशी त्याची समजूत झाली होती. परंतु सदर मजकूर लिहिणारा पत्रकार वेगळाच असल्याचं व आपण भलत्याच पत्रकाराला शिव्या घातल्याचं समजल्यावर कोहलीनं दुस-या एका पत्रकाराच्या मार्फत घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.
या घटनेनंतर शास्त्रींनी विराट कोहलीला समज दिली असून सबुरीनं वागायचा सल्ला दिला असल्याचं समजतं.