छाप उमटवण्यास विराट सेना उत्सुक

By Admin | Updated: August 12, 2015 04:28 IST2015-08-12T04:28:48+5:302015-08-12T04:28:48+5:30

भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याची २२ वर्षांची प्रतीक्षा संपविण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला उद्या, बुधवारपासून प्रारंभ होत असून कर्णधार विराट

Virat army keen to impress | छाप उमटवण्यास विराट सेना उत्सुक

छाप उमटवण्यास विराट सेना उत्सुक

कसोटी मालिका : श्रीलंकेविरुद्ध पहिली लढत आजपासून

गाले : भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याची २२ वर्षांची प्रतीक्षा संपविण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला उद्या, बुधवारपासून प्रारंभ होत असून कर्णधार विराट कोहलीची पाच गोलंदाजांसह खेळण्याची आक्रमक रणनीती यशस्वी ठरते का, याबाबत उत्सुकता आहे. महेंद्रसिंह धोनीकडून कोहलीला सिडनीमध्ये कसोटी संघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. भारताने त्यानंतर बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला, पण कर्णधार म्हणून कोहलीसाठी ही पहिलीच पूर्ण मालिका आहे. कोहलीने आक्रमक नेतृत्व करण्याचे आश्वासन दिले असून २० बळी घेण्यासाठी कसोटी सामन्यात पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
कोहलीने सर्वप्रथम धोनी दुखापतग्रस्त असताना अ‍ॅडिलेड कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. भारताला या लढतीत ४२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, पण कोहलीच्या नेतृत्वाची प्रशंसा झाली होती. त्याने दोन्ही डावात शतके झळकावली होती.
त्यानंतर कोहलीने फतुल्लाहमध्ये बांगलादेशविरुद्ध पाच गोलंदाजांना संधी दिली. या लढतीत दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने पुनरागमन केले होते. सराव सामना व सरावसत्राचा विचार करता आगामी मालिकेत कोहली ही रणनीती कायम राखणार असल्याचे संकेत मिळत आहेत. स्नायूच्या दुखापतीमुळे मुरली विजयने पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्यामुळे कोहलीकडे युवा लोकेश राहुलला संधी देण्याचा सोपा पर्याय आहे.
फलंदाजीबाबत विचार करता अजिंक्य रहाणे पाचव्या स्थानी खेळणार असल्याचे निश्चित आहे. रोहित शर्मा, कोहली आणि वृद्धिमान साहा यांची सराव सामन्यातील कामगिरी निराशाजनक होती. हे फलंदाज फॉर्मात नाहीत, असे वक्तव्य करणे घाईचे ठरले. कारण ते महिनाभराच्या ब्रेकनंतर खेळत आहेत.
कोहलीने आॅस्ट्रेलियात शानदार फलंदाजी करताना कसोटी मालिकेत चार शतके ठोकली होती; पण त्यानंतर त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने विश्वकप स्पर्धेत पाकविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी केली होती.
पाकविरुद्धच्या लढतीपूर्वी खेळल्या गेलेल्या ४ वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता, तर त्यानंतरच्या १० सामन्यांत त्याची सर्वाधिक धावसंख्या होती ४६ धावा. मधल्या फळीची भिस्त कोहलीच्या कामगिरीवर अवलंबून असणे संघासाठी चिंतेचा विषय आहे. रोहित शर्मा कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे संघाच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. रोहितच्या उपस्थितीमुळे चेतेश्वर पुजारासारख्या फलंदाजाला अंतिम संघातून बाहेर बसावे लागते.
कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १९९३ नंतर श्रीलंकेत प्रथमच मालिका विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजी आक्रमणाची धुरा धम्मिका प्रसाद सांभाळणार असून त्याची साथ देण्यासाठी पदार्पणाच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेला विश्व फर्नांडो सज्ज आहे. फर्नांडोने सराव सामन्यात दुसऱ्या डावात १७ धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेतले होते. रंगाना हेराथ, दिलरुवान परेरा आणि थारिंडू कौशल फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहे. कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजसाठी संघाची फलंदाजी चिंतेचा विषय आहे. कौशलने फॉर्म कायम राखला तर संगकारा व मॅथ्यूजवरील दडपण कमी होईल. (वृत्तसंस्था)

प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेण्यासाठी पाच गोलंदाजांसह खेळण्याचे कोहलीने संकेत दिले आहे. हवामान खात्याने आठवडाभर ढगाळ वातावरण राहणार असून, पावसाची शक्यताही वर्तविली आहे. त्यामुळे संघात तीन फिरकीपटूंना संधी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर लेग स्पिनर अमित मिश्राने विशेष सराव केलेला नाही. सोमवारी ऊन पडल्यामुळे खेळपट्टी कोरडी असल्याचे भासत होते. त्यामुळे टीम इंडियातर्फे ३ वेगवान गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कोहलीची नजर वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर आहे. अशा परिस्थितीत उमेश यादव व वरुण अ‍ॅरोन यांना ईशांत शर्माच्या साथीने खेळण्याची संधी मिळू शकते. शास्त्री यांनी तळाच्या फळीत रविचंद्रन आश्विन व हरभजनसिंग या जोडीवर विश्वास व्यक्त केला आहे.

संघाचे कर्णधारपद भूषवण्यासाठी सज्ज : कोहली
कर्णधार म्हणून प्रथमच पूर्ण मालिकेत संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्यामुळे उत्साहित असून, श्रीलंकेविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला, ‘‘कर्णधार म्हणून माझी ही पहिलीच पूर्ण मालिका आहे. तीन सामन्यांची मालिका असल्यामुळे लय गवसण्यासाठी चांगली संधी आहे. माझ्या डोक्यात काही योजना असून, त्या अमलात आणण्याची ही संधी आहे. एखाद्या दिवशी कामगिरी निराशाजनक झाली, तर तुमच्याकडे कुठे चूक झाली, याचे चिंतन करण्याची संधी असते. कामगिरी चांगली झाली, तर कुठली बाब सकारात्मक होती आणि कुठल्या विभागात सुधारणा करण्याची गरज आहे, याबाबत विचार करता येतो.

‘मी ब्रॅडमनला नाही; पण संगकाराला खेळताना बघितले आहे’...
श्रीलंकेचा कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजने दिग्गज फलंदाज कुमार संगकाराची प्रशंसा केली. मॅथ्यूजने निवृत्तीची घोषणा करणारा महान फलंदाज संगकारा आणि सर डॉन ब्रॅडमन यांचा उल्लेख एकत्र केला. मॅथ्यूजने संगकारा आपल्या काळातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे. संगकारा कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरला आहे, असेही मॅथ्यूज म्हणाला. भारताविरुद्ध बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना मॅथ्यूज म्हणाला, ‘‘संगकाराने गेल्या १५ वर्षांत जशी कामगिरी त्यामुळे आम्ही त्याचे आभारी आहोत. मी बघितलेल्या फलंदाजांमध्ये कामगिरीत सातत्य राखणारा संगकारा एकमेव फलंदाज आहे. मी महान फलंदाज डोनाल्ड ब्रॅडमन यांना खेळताना बघितले नाही, पण संगकाराला सातत्याने चमकदार कामगिरी करताना बघितले आहे. ’’

लाहोरमधील हल्ला माझ्या जीवनातील सर्वांत भीतीदायक क्षण : संगकारा
जवळजवळ तीन दशके गृहयुद्धाची भीषणता अनुभवणाऱ्या श्रीलंका क्रिकेटला नवी उंची गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी कर्णधार कुमार संगकाराने अखेरची मालिका खेळण्यापूर्वी कारकिर्दीतील काही आठवणीमुळे भावूक झाला. लाहोरमध्ये संघावर झालेला दहशतवादी हल्ला माझ्या जीवनातील सर्वांत भीतीदायक क्षण असल्याचे संगकारा म्हणाला. विश्वकप स्पर्धेनंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा संगकारा बुधवारपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार आहे. संगकारा म्हणाला, ‘‘मार्च २००९ मध्ये श्रीलंका संघावर लाहोरमध्ये झालेला हल्ला माझ्या जीवनातील सर्वांत भीतीदायक क्षण होता. मी ही घटना कधीच विसरू शकत नाही.’’

प्रतिस्पर्धी संघ..
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रविचंद्रन आश्विन, हरभजन सिंग, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव व वरुण अ‍ॅरॉन.

श्रीलंका : अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहिरू थिरीमाने, कौशल सिल्वा, दिमुथ करुणारत्ने, कुमार संगकारा, दिनेश चंडीमल, उपुल थरंगा, जेहान मुबारक, कुशल परेरा, रंगाना हेराथ, दिलरुवान परेरा, थारिंडू कौशल, नुवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, विश्व फर्नांडो आणि दुष्यंता चमीरा (फिटनेसवर अवलंबून)

Web Title: Virat army keen to impress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.