विक्रमवीर विराट कोहली
By Admin | Updated: May 18, 2016 06:02 IST2016-05-18T06:02:38+5:302016-05-18T06:02:38+5:30
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याने आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक धावा ठोकण्याचा नवा विक्रम नोंदविला

विक्रमवीर विराट कोहली
नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याने आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक धावा ठोकण्याचा नवा विक्रम नोंदविला. काल कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ७५ धावांची खेळी करीत विराटने हा विक्रम स्वत:च्या नावे केला. त्याने आतापर्यंत १२ सामन्यात ७५२ धावा केल्या आहेत.
साखळीतील संघाचे दोन सामने अद्याप शिल्लक असले तरी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या कोहलीने ख्रिस गेल आणि मायकेल हसी यांना मागे टाकले. एका सत्रात सर्वाधिक धावा नोंदविण्याची संधी कोहलीला आहे. कोहलीन्ला सुरुवातीला हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्याकडून आव्हान मिळाले होते. वॉर्नर सध्या तिसऱ्या स्थानावर घसरला. आरसीबीत कोहलीचा सहकारी असलेला डिव्हिलियर्स हा धावा काढण्यात दुसऱ्या स्थानावर आहे.
डिव्हिलियर्सच्या १२ सामन्यात ५९७ धावा काढल्या असून त्याच्यात व कोहलीत १५५ धावांचे अंतर आहे. वॉर्नरच्या १२ सामन्यात ५६७ धावा आहेत. या तिघांशिवाय अन्य कुणीही आॅरेंज कॅपच्या चढाओढीत नाही. चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याच्या ४५९ आणि पाचव्या स्थानावर असलेला केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरच्या ४४९ धावा आहेत.
आयपीएलच्या एका सत्रात ७०० वर धावा काढण्याचा मान आतापर्यंत दोनच फलंदाजांनी मिळविला. गेल्या दोन सत्रात एकही फलंदाज अशी कामगिरी करू शकला नव्हता. गेलने दोनदा आॅरेंज कॅप मिळविली. यंदा तो अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. सहा डावात त्याच्या केवळ ६८ धावा आहेत. (वृत्तसंस्था)
>गेलने २०१२ मध्ये १५ सामन्यात ७३३ धावा केल्या. त्याने सचिनचा २०१० मध्ये केलेल्या ६१८ धावांचा विक्रम मोडित काढला होता.
गेलने त्यानंतर २०१३ मध्ये १७ सामन्यात ७३३ धावा ठोकल्या. किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज शॉन मार्श याने २००८ च्या पहिल्या सत्रात ६१६ धावा ठोकून विक्रमाला सुरुवात केली होती.
कोहली नवव्या सत्रात धमाल करीत असून त्याने १२ सामन्यात तीन शतके आणि पाच अर्धशतकांची नोंद केली आहे. यंदा आॅरेंज कॅपचा तोच मानकरी ठरणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
>आॅरेंज कॅपचे
मानकरी खेळाडू
२००८- शॉन मार्श (६१६ धावा) २००९- मॅथ्यू हेडन (५७२ धावा) २०१०- तेंडुलकर (६१८ धावा)
२०११- ख्रिस गेल (६०८ धावा)
२०१२- ख्रिस गेल (७३३ धावा)
२०१३-माईक हस्सी(७३३ धावा)
२०१४- रॉबिन उथप्पा(६६० धावा)
२०१५- डेव्हिड वॉर्नर(५६२ धावा)