विक्रमांची स्पर्धा...
By Admin | Updated: March 16, 2015 23:49 IST2015-03-16T23:49:52+5:302015-03-16T23:49:52+5:30
साखळी फेरीत ३०० पेक्षा अधिक धावा, सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक षटकार यांचे नवे विक्रम नोंदवले गेले.

विक्रमांची स्पर्धा...
साखळी फेरी : शतके, षटकार व सर्वाधिक धावसंख्येचे विक्रम
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विश्वकप २०१५ च्या स्पर्धेपूर्वी बॅट व बॉल यांच्यात समतोल साधल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मात्र फलंदाजांनीच वर्चस्व गाजवल्याचे दिसून येते. साखळी फेरीत ३०० पेक्षा अधिक धावा, सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक षटकार यांचे नवे विक्रम नोंदवले गेले. एका विश्वकप स्पर्धेत नोंदवल्या गेलेला धावांचा विक्रम उपांत्यपूर्व फेरीमध्ये मोडला जाणार असल्याचे निश्चित आहे. हा विक्रम मोडण्यासाठी केवळ ११८६ धावांची गरज आहे. विश्वकप २००७ व २०११ मध्ये सारख्या २१,३३३ धावा फटकावल्या गेल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत आतापर्यंत एकूण २०१४७ धावा फटकावल्या गेल्या आहेत. त्यात १९१२२ धावा फलंदाजांनी फटकावल्या आहेत. एका विश्वकप स्पर्धेत फलंदाजांनी फटकावलेल्या धावा १९९८६ आहेत. २०११ च्या विश्वकप स्पर्धेत त्या नोंदवल्या गेल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत केवळ ४१ सामने खेळले गेले असून २०११ च्या विश्वकप स्पर्धेत ४९ व २००७ च्या विश्वकप स्पर्धेत ५१ सामने खेळले गेले होते.
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जात असलेल्या विश्वकप स्पर्धेत फलंदाजांनी एकूण ३५ शतके नोंदवली आहेत. विश्वकप स्पर्धेत हा नवा विक्रम आहे. यापूर्वी भारत, श्रीलंका व बांगलादेश यांच्या संयुक्त यजमानपदाखाली २०११ मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकप स्पर्धेत एकूण २४ शतके नोंदवली गेली होती.
विश्वकप स्पर्धेचा प्रारंभ १९७५ मध्ये झाला. त्या वेळी या स्पर्धेत केवळ सहा शतकांची नोंद झाली होती. त्यानंतर चार वर्षांनी १९७९ मध्ये केवळ दोन शतके नोंदवली गेली. याव्यतिरिक्त १९८३ व १९९२ मध्ये प्रत्येकी ८ व १९८७ व १९९९ मध्ये प्रत्येकी ११ शतकांची नोंद झाली. दरम्यान, १९९६ मध्ये भारतीय उपखंडात खेळल्या गेलेल्या विश्वकप स्पर्धेत १६ शतकांची नोंद झाली, पण २००३ मध्ये हा विक्रम मोडला गेला. त्या वेळी २१ शतके फटकावली गेली. हा विक्रम २०११ पर्यंत कायम होता. २००७ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत २० शतकांची नोंद झाली.
सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ४ शतके ठोकली असून हा विक्रम आहे. यापूर्वी मार्क वॉने १९९६ मध्ये, सौरभ गांगुलीने २००३ मध्ये आणि मॅथ्यू हेडनने २००७ मध्ये तीन शतके झळकावण्याची कामगिरी केली आहे. संगकाराने सलग चार सामन्यांत शतके झळकावली. हा वन-डे क्रिकेटमध्ये नवा विक्रम आहे.
श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, भारताचा शिखर धवन, बांगलादेशचा महमुदुल्लाह आणि झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलर यांनी सध्या सुरू असलेल्या विश्वकप स्पर्धेत प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत. संगकाराला आता सचिन तेंडुलकरचा स्पर्धेतील सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम खुणावत आहे. सचिनने १९९२ ते २०११ या कालावधीत सहा विश्वकप स्पर्धेत प्रतिनिधित्व करताना सहा शतके ठोकली आहेत. संगकाराच्या नावावर एकूण पाच शतकांची नोंद आहे. संगकारा आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स यांचेही लक्ष सचिनचा विक्रम मोडण्यावर केंद्रित झाले आहे. या दोन्ही फलंदाजांच्या नावावर प्रत्येकी चार शतकांची नोंद आहे. श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेनेही चार शतके झळकावली असून तो कारकिर्दीतील अखेरची विश्वकप स्पर्धा संस्मरणीय ठरवण्यास प्रयत्नशील आहे.
(वृत्तसंस्था)
च्षटकारांबाबत चर्चा करताना या वेळी विश्वकप स्पर्धेत आतापर्यंत एकूण ३८८ षटकारांची नोंद झाली आहे. विश्वकप स्पर्धेत हा एक विक्रम आहे. यापूर्वीचा विक्रम २००७ मध्ये नोंदवला गेला होता. त्या वेळी ३७३ षटकारांची नोंद झाली होती. पहिल्या विश्वकप स्पर्धेत केवळ २८ षटकारांची नोंद झाली होती. भारतीय उपखंडात २०११ मध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत २५८ षटकारांची नोंद झाली होती. यापेक्षा अधिक षटकार (२६६) दक्षिण आफ्रिकेत २००३ मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकप स्पर्धेत नोंदवले गेले होते.
च्डिव्हिलियर्सने या विश्वकप स्पर्धेत २० षटकार ठोकले आहेत. त्याने २००७ मध्ये हेडनने नोंदवलेल्या १८ षटकारांचा विक्रम मोडला. ख्रिस गेलने या स्पर्धेत १८ षटकारांची नोंद करीत हेडनच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. दरम्यान, डिव्हिलियर्सने विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला आहे. २००७ पासून विश्वकप स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या डिव्हिलियर्सने ३६ षटकार लगावले आहेत. त्याने रिकी पॉन्टिंगचा (३१) विक्रम मोडला. गेल २९ षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.
च्आॅस्ट्रेलियाने या वेळी अफगाणिस्तानविरुद्ध पर्थमध्ये ६ बाद ४१७ धावा फटकावीत विश्वकप स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. याआधी सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम भारताच्या नावावर होता. भारताने २००७ मध्ये बर्म्युडाविरुद्ध ४ बाद ४११ धावा फटकावल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत दोनदा ४०० पेक्षा अधिक धावसंख्या नोंदवली आहे. विंडीजमध्ये २००७ मध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेपर्यंत ३०० धावांपर्यंत मजल मारणे सोपे नव्हते. यापूर्वी १९८३ मध्ये चार, १९८७ मध्ये एक, १९९२ मध्ये दोन, १९९६ मध्ये पाच, १९९९ मध्ये तीन आणि २००३ मध्ये नऊ वेळा ३०० पेक्षा अधिक धावांची नोंद झाली होती.
च्विश्वकप स्पर्धेच्या साखळी फेरीत ३०० पेक्षा अधिक धावांची २५ वेळा नोंद झाली आहे. हा एक विक्रम आहे. यापूर्वी २०११ मध्ये १७ वेळा संघांना ३०० पेक्षा अधिक धावसंख्या नोंदवता आली होती; तर २००७ मध्ये ही संख्या १६ होती. १९७५ च्या विश्वकप स्पर्धेत संघांनी चार वेळा ३०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या होत्या; तर १९७९ मध्ये एकाही संघाला हा पराक्रम करता आला नाही. त्या वेळी वेस्ट इंडिजने नोंदवलेली ६ बाद २९३ ही धावसंख्या सर्वोच्च
होती.