विजेंदरचे चीनच्या जुल्फिकारला आव्हान
By Admin | Updated: February 17, 2017 00:26 IST2017-02-17T00:26:08+5:302017-02-17T00:26:08+5:30
भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदरसिंग चीनचा ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन जुल्फिकार मियामॅतियाली याला आव्हान देणार

विजेंदरचे चीनच्या जुल्फिकारला आव्हान
नवी दिल्ली : भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदरसिंग चीनचा ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन जुल्फिकार मियामॅतियाली याला आव्हान देणार आहे. आशिया पॅसिफिक चॅम्पियन असलेल्या विजेंदरला दुसरे जेतेपद मिळविण्याची आशा असून, ही ‘फाईट नाईट’ १ एप्रिल रोजी मुंबईत खेळली जाईल.
राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णविजेता अखिलकुमार आणि आशियाई चॅम्पियनशिपचा कांस्यविजेता जितेंदरकुमार हेदेखील याच लढतीत खेळणार असले, तरी त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत.
सर्किटमध्ये विजेंदर सध्या अपराजित असून, ब्रिटिश ट्रेनर ली बियर्ड यांच्या मार्गदर्शनात मँचेस्टरमध्ये सराव करीत आहे. जुल्फिकारविरुद्ध होणारी लढत विजेंदरची भारतातील तिसरी लढत असेल. आधीच्या दोन लढती दिल्लीत झाल्या होत्या. ही लढत जिंकल्यास विजेंदरकडे दोन जेतेपद असतील. (वृत्तसंस्था)
1चीनचा जुल्फिकारने विजेंदरप्रमाणे २०१५मध्ये व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत खेळलेल्या ८पैकी ७ लढती त्याने जिंकल्या. मागच्या वर्षी ७ जुलै रोजी टांझानियाचा थॉमस मशालीला धूळ चारून त्याने डब्ल्यूबीओ ओरिएन्टल विजेतेपदाचा मान मिळविला होता.
2विजेंदरनेदेखील आतापर्यंत आठ लढती जिंकल्या. त्यापैकी सात लढतीत त्याला नॉक आऊट विजय मिळविता आला, हे विशेष. मागच्या डिसेंबरमध्ये ३१ वर्षांच्या झालेल्या विजेंदरने टांझानियाचा फ्रान्सिस चेकाला नमवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिकचे जेतेपद कायम राखले होते.