गुजरातवर विजयास डेअरडेव्हिल्स उत्सुक
By Admin | Updated: May 4, 2017 00:39 IST2017-05-04T00:39:17+5:302017-05-04T00:39:17+5:30
सलग पाच सामन्यांतील पराभवानंतर फलंदाजांना सूर गवसताच आयपीएल-१० मध्ये अपेक्षा उंचावलेला दिल्ली

गुजरातवर विजयास डेअरडेव्हिल्स उत्सुक
नवी दिल्ली : सलग पाच सामन्यांतील पराभवानंतर फलंदाजांना सूर गवसताच आयपीएल-१० मध्ये अपेक्षा उंचावलेला दिल्ली डेअरडेव्हिल्स आज गुरुवारी गुजरात लायन्सवर विजय नोंदविण्यास उत्सुक आहे.
दिल्लीने काल रात्री रोमहर्षक लढतीत सनरायझर्स हैदराबादवर सहा गड्यांनी विजय नोंदवीत प्ले आॅफची आशा पल्लवीत ठेवली. नऊ सामन्यांत सहा गुण असलेल्या दिल्लीची पुढील वाटचाल सोपी नाही. राहुल द्रविडचे मार्गदर्शन असलेल्या या संघाला उर्वरित पाचही सामने जिंकण्याचे आव्हान असेल. यापैकी चार सामने घरच्या फिरोजशाह कोटलावर खेळले जातील, ही दिलासा देणारी बाब ठरावी. दिल्लीचे फलंदाज आता कुठे अपेक्षेनुसार धावा काढत आहेत. तथापि, एकही पराभव स्पर्धेबाहेर होण्यास कारणीभूत ठरू शकतो, हे व्यवस्थापनाला माहीत असल्याने शिथिलता बाळगणे धोकादायक ठरू शकते.
गुजरातची डोकेदुखीदेखील फलंदाजांचे अपयश हीच आहे. दहापैकी सात सामने गमावलेल्या या संघाचे सहा गुण आहेत. ‘प्ले आॅफ’ गाठणे संघाला कठीण वाटत असले, तरी आकड्यांच्या खेळात त्यांना लाभ होऊ शकतो. आॅस्ट्रेलियाचा अॅन्ड्र्यू टाय खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडताच लायन्सची गोलंदाजीदेखील कमकुवत झाली.