विजय नवनाथ उपांत्य फेरीत

By Admin | Updated: May 16, 2016 05:01 IST2016-05-16T05:01:47+5:302016-05-16T05:01:47+5:30

दोन्ही मुंबई शहराच्या संघांनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना विजय क्लबच्या वतीने सुरू असलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली

Vijay Navnath in the semi-finals | विजय नवनाथ उपांत्य फेरीत

विजय नवनाथ उपांत्य फेरीत

मुंबई : विजय नवनाथ आणि साउथ केनरा या दोन्ही मुंबई शहराच्या संघांनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना विजय क्लबच्या वतीने सुरू असलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याच वेळी महाराष्ट्र रहाटणी (पुणे) आणि शिवशंकर (कल्याण -ठाणे) यांनीही उपांत्य फेरीत प्रवेश करताना चमक दाखवली.
शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात, विजय नवनाथने बाजी मारताना ओम साई संघाचा २४-४ असा फडशा पाडला. मध्यंतराला विजय संघाने सावध भूमिका घेत ६-३ अशी आघाडी घेतली होती. यानंतर मात्र, जबरदस्त वेगवान खेळ करताना ओम साईला प्रतिकाराची एकही संधी न देता दिमाखात उपांत्य फेरी गाठली. सागर कुरहाडे, अमित चव्हाण यांच्या खोलवर चढाया व संजय राणे,
योगेश सुर्वे यांच्या दमदार
पकडी विजय नवनाथसाठी निर्णायक ठरल्या.
साउथ केनरानेही दमदार बाजी मारताना कसलेल्या एच. जी. एस.चे कडवे आव्हान २४-१३ असे परतावले. सुरुवातीपासून नियोजनबद्ध खेळ करताना साउथ केनराने एचजीएसवर लोण देताना मध्यंतराला १३-६ असे वर्चस्व राखले. यानंतर, मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम ठेवताना केनराने विजयी कूच केली. कोकिला शेट्टीच्या जबरदस्त पकडी आणि गौरव शेट्टी, हर्षित यांच्या आक्रमक चढाईच्या जोरावर केनराने विजय मिळवला.
दुसऱ्या बाजूला प्रदीप गिरी, चेतन थोरात यांनी केलेल्या खोलवर चढायांच्या जोरावर महाराष्ट्र राहाटणीने दमदार आगेकूच करताना अंकुरचा कडवा प्रतिकार १७-९ असा मोडला. मध्यंतराला सामना ३-३ असा बरोबरीत राहिल्यानंतर वेगवान खेळ करताना महाराष्ट्र रहाटणीने उपांत्य फेरी निश्चित केली. गणेश ठेरंगे, अमोल नरकते यांनी मजबूत पकडी करत अंकुरच्या आक्रमणातील हवा काढली. तर अन्य लढतीत शिवशंकरने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करताना यंग प्रभादेवीला १४-९ सहज नमवले. मध्यंतराला ९-७ अशी आघाडी राखल्यानंतर शिवशंकरने आक्रमक खेळ केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Vijay Navnath in the semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.