ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे निधन
By Admin | Updated: May 23, 2014 11:44 IST2014-05-23T09:28:54+5:302014-05-23T11:44:50+5:30
मुंबई क्रिकेटमध्ये अतुलनीय योगदान देणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे शुक्रवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे निधन
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २३- मुंबई क्रिकेटमध्ये अतुलनीय योगदान देणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे शुक्रवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. माधव मंत्री हे बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सुनील गावस्कर यांचे मामा आहेत.
सलामीचे फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटचे मैदान गाजवणा-या माधव मंत्री यांचा जन्म १९२१ मध्ये नाशिकमध्ये झाला होता. अत्यंत करड्या शिस्तीचे क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे माधव मंत्री यांनी १९४१ रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर १९५१ मधील इंग्लंड दौ-यात त्यांना भारतीय संघात जागा पटकावली होती. या कसोटीत इंग्लंडच्या तेजतर्रार मा-यासमोर मंत्री यांनी ३५ धावा करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मंत्री हे ४ कसोटी सामने खेळले होते. मात्र रणजीत मंत्री यांची कामगिरी लक्षणीय होती. रणजी सामन्यांमध्ये मंत्री यांनी ९५ सामन्यांमध्ये ४,४०३ धावा केल्या आहेत. यात ७ शतक आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. मंत्री यांनी रणजीत मुंबई संघांचे नेतृत्वही केले होते. १९६८ मध्ये मंत्री यांनी क्रिकेटला अलविदा केले. निवृत्तीनंतर मंत्री यांनी दादर युनियनच्या माध्यमातून मुंबई क्रिकेटला अनेक क्रिकेटपटू दिले. मुंबई क्रिकेटचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.