मुंबई : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (डीएसओ) आयोजित विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रद्द झाल्याची बातमी लोकमतने प्रसिद्ध करताच डीएसओ खडबडून जागे झाले. गुरुवारी सामना तांत्रिक कारणामुळे पुढे ढकल्याचे खालसा आणि एन.एल संघांना तोंडी सांगण्यात आले होते. मात्र अधिकृत पत्र देण्यात आले नव्हते. लोकमतने रविवारच्या अंकात याबद्दल बातमी प्रसिद्ध करताच काही तासांतच डीएसओने खालसा महाविद्यालयाला अधिकृत पत्राद्वारे व्हॉलीबॉल अंतिम सामना पुढे ढकल्याचे सांगितले. व्हॉलीबॉल अंतिम सामन्याच्या वादावर पडदा टाकण्यासाठी डीएसओने रविवारी सुट्टीच्या दिवशीही वेगाने सुत्र हलवली. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास खालसा महाविद्यालयाचे आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विभागप्रमुख हरदिपसिंग सैनी यांना व्हॉट्स अॅपमार्फत डीएसओने अधिकृत पत्र पाठविले. एन.एल.महाविद्यालयाच्या निलेश ठक्कर यांना डीएसओच्या अधिकृत पत्राबाबत विचारले असता गुरुवारी सामना पुढे ढकलल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी आम्ही डीएसओकडून हा निर्णय लिहून देण्याची मागणी केली. डीएसओ अधिकाऱ्यांनी मागणी पूर्ण करत आम्हाला सामना तांत्रिक कारणामुळे पुढे ढकल्याचे लिहून दिले. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने सोमवारी पत्राबाबत माहिती मिळेल, असे ते म्हणाले. डीएसओने दिलेल्या पत्रात खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या बाबत खालसा महाविद्यालयाला विचारले असता, कोणत्याही स्वरुपाची बाचाबाची झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (क्रीडा प्रतिनिधी)
चक्क सुट्टीच्या दिवशीही ‘डीएसओ’ लागले कामाला
By admin | Updated: October 24, 2016 04:57 IST