व्हीनस अंतिम फेरीत

By Admin | Updated: October 3, 2015 00:29 IST2015-10-03T00:29:30+5:302015-10-03T00:29:30+5:30

जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू अमेरीकेच्या व्हीनस विलियम्सने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात इटलीच्या रॉबर्टा विंचीला नमवले

Venus in the final round | व्हीनस अंतिम फेरीत

व्हीनस अंतिम फेरीत

वुहान : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू अमेरीकेच्या व्हीनस विलियम्सने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात इटलीच्या रॉबर्टा विंचीला नमवले आणि वुहान ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे यंदाच्या यूएस ओपन उपांत्य सामन्यात विंचीने धक्कादायक निकाल नोंदवताना बलाढ्य सेरेना विलियम्सला नमवून तीचे कॅलेंडर ग्रँडस्लॅमचे स्वप्न धुळीस मिळवले होते. या विजयासह व्हीनसने आपल्या लहान बहिणीच्या पराभवाचा वचपा काढला.
३५ वर्षांच्या अनुभवी व्हीनसने चुरशीच्या झालेल्या या लढतीत आपला सर्व अनुभव पणास लावत विंचीचे कडवे आव्हान ५-७, ६-२, ७-६ असे परतावून लावले. विशेष म्हणजे विंचीने पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकताना आश्चर्यकाराक आघाडी घेतली होती. यावेळी विंची
व्हीनसला धक्का देणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र व्हीनसने झुंजार खेळ करताना जबरदस्त पुनरागमन केले.
दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेताना व्हीनसने वेगवान सर्विस आणि ताकदवान फटके मारताना विंचीला बेजार केले. केवळ दोन गेम गमावून व्हीनसने सहजपणे सेट जिंकून सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये नेला. अंतिम सेटमध्ये पुन्हा एकदा तोडीस तोड खेळ पाहायला मिळाला.
दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारुन आत्मविश्वास मिळवलेली व्हीनस अधिक आक्रमक दिसली. त्याचवेळी विंची सहजासहजी हार मानण्यास तयार नसल्याने प्रेक्षकांना उच्च दर्जाचा खेळ पाहण्यास मिळाला. व्हीनसने ३-१ अशी आघाडी घेत तिसऱ्या सेटमध्ये वर्चस्व मिळवले होते. मात्र विंचीने दमदार खेळ करताना ५-५ अशी बरोबरी साधली.
यानंतर टायब्रेकमध्ये गेलेल्या या सेटमध्ये व्हीनसने निर्णायक क्षणी खेळ उंचावताना विंची पुन्हा धक्कादायक निकाल नोंदवणार नसल्याची खबरदारी घेत बाजी मारली. दरम्यान ७ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलेल्या व्हीनसने तीन तास पर्यंत रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवत कारकिर्दीत ७७व्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Venus in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.