नेपाळच्या फिरकीपटूंना वेंकटपती राजू तयार करणार
By Admin | Updated: June 9, 2015 02:22 IST2015-06-09T02:22:24+5:302015-06-09T02:22:24+5:30
धर्मशाळा येथे सुरू असलेल्या नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या १५ दिवसीय शिबिरामध्ये भारताचे माजी फिरकीपटू वेंकटपती राजू मार्गदर्शन करणार आहेत.

नेपाळच्या फिरकीपटूंना वेंकटपती राजू तयार करणार
नवी दिल्ली : धर्मशाळा येथे सुरू असलेल्या नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या १५ दिवसीय शिबिरामध्ये भारताचे माजी फिरकीपटू वेंकटपती राजू मार्गदर्शन करण्यास तयार असल्याची माहिती नेपाळचे मुख्य प्रशिक्षक व श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू पुबुदु दस्सानायके यांनी दिली. आशियाई क्रिकेट परिषदेचे विकास अधिकारी म्हणून राजू यांनी यापूर्वी संयुक्त अरब अमिरीती (यूएई) आणि थायलंड संघाला मार्गदर्शन केले आहे.
भूकंपाच्या प्रलयानंतर नेपाळचा राष्ट्रीय संघ सध्या धर्मशाळा येथे आपल्या राष्ट्रीय शिबिरासाठी आला आहे. याविषयी दस्सानायके यांनी सांगितले, की वेंकटपती राजू ११ जूनला शिबिराच्या ठिकाणी येत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले असून, आठवडाभर ते संघासोबत शिबिरामध्ये सहभाग घेतील. संघातील फिरकी गोलंदाजांवर विशेष लक्ष देतील. त्यांच्या मदतीमुळे आम्हाला खूप फायदा होणार आहे. शिवाय राजस्थान रॉयल्स प्रशिक्षक माँटी देसाईदेखील येणार असल्याची माहिती मिळाली असून, बीसीसीआयने आम्हाला इतर बाबतीत विशेष मदत करणार असल्याचे सांगितले, असेही दस्सानायके यांनी सांगितले.
फिरकी गोलंदाजी आमची ताकद असून, बसंत रेगमी आणि शक्ती गाउचन हे आमचे अव्वल फिरकीपटू आहेत. या दोघांनाही राजू ब्रिटनच्या परिस्थितीची माहिती देतील. शिवाय बीसीसीआयने आम्हाला जी मदत केली आहे, त्याने आम्ही खूप खूश आहोत, असेही दस्सानायके म्हणाले.
त्याचबरोबर नेपाळचा कर्णधार पारस खडका यानेदेखील राजू यांच्या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले, की भारताकडे अनेक विशेषज्ञ आहेत, ज्यांच्याकडून मदत घेता येईल. राजू यांच्या दीर्घ अनुभवातून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळणार असून, आम्ही त्यानुसार पात्रता स्पर्धेत इंग्लंडमध्ये खेळू.