वीरधवल बेस्ट स्विमर
By Admin | Updated: November 2, 2015 00:20 IST2015-11-02T00:20:28+5:302015-11-02T00:20:28+5:30
येथे सुरु असलेल्या ६९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेला बेस्ट स्विमरचा पुरस्कार देण्यात आला.

वीरधवल बेस्ट स्विमर
कोल्हापूर : येथे सुरु असलेल्या ६९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेला बेस्ट स्विमरचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह, एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळविले. महिलांच्या गटात गुजरातच्या मना पटेलला हा पुरस्कार देण्यात आला. पदकतालिकेत १४ सुवर्णपदकांसह रेल्वेचा संघ प्रथम स्थानावर राहिला. कर्नाटक दुसऱ्या, तर ८ सुवर्ण, ११ रौप्य आणि २९ कांस्यपदके मिळवणारा महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर राहिला. कर्नाटकला स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.
शेवटच्या दिवशी महाराष्ट्राला एकूण सात पदके मिळाली. यात एक सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. सुवर्णपदकाचा मान ४ बाय ५0 मीटर फ्रीस्टाईल मिश्र रिले संघाने मिळवून दिला. या संघात विराज प्रभू, आदिती धुमाटकर, अवंतिका चव्हाण आणि वीरधवल खाडे यांचा समावेश होता.
पुरुषांच्या ५0 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात शनिवारी सुवर्णपदक जिंकणाऱ्या वीरधवलला रविवारी १00 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. वीरधवलने ५१.७५ अशी वेळ नोंदविली. या गटात रेल्वेच्या वरुण अॅरोनने ५१.२१ अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले.
महिलांच्या ८00 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या मोनिक गांधीने रौप्यपदक जिंकले. तिने ९:२४.७४ अशी वेळ नोंदविली. या गटात रायना सालडान्हा हिने ९:२९.१९ अशी वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले. कर्नाटकची मालविका व्ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली. महिलांच्या ५0 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राला रौप्य आणि कांस्य अशी दोन पदके मिळाली. जोत्स्ना पानसरे ३१.३२ वेळेसह दुसऱ्या तर अवंतिका चव्हाण ३१.८९ अशा
वेळेसह तिसऱ्या क्रमांकावर राहीली. गुजरातची मना पटेल सुवर्णपदक विजेती ठरली. (क्रीडा प्रतिनिधी)