रशियन अॅथलेटिक्स महासंघाला निलंबित करण्याचा आग्रह
By Admin | Updated: November 10, 2015 23:13 IST2015-11-10T23:13:04+5:302015-11-10T23:13:04+5:30
विश्व डोपिंगविरोधी एजन्सीच्या (वाडा) स्वतंत्र आयोगाने आपल्या एका अहवालात रशियन अॅथलेटिक्स महासंघावर २०१६ च्या आॅलिम्पिक खेळासह सर्वंच स्पर्धांसाठी निलंबनाची कारवाई करण्याची सूचना केली आहे.

रशियन अॅथलेटिक्स महासंघाला निलंबित करण्याचा आग्रह
जिनिव्हा : विश्व डोपिंगविरोधी एजन्सीच्या (वाडा) स्वतंत्र आयोगाने आपल्या एका अहवालात रशियन अॅथलेटिक्स महासंघावर २०१६ च्या आॅलिम्पिक खेळासह सर्वंच स्पर्धांसाठी निलंबनाची कारवाई करण्याची सूचना केली आहे.
या अहवालामध्ये रशियन सरकारच्या संगनमताने अॅथलेटिक्स महासंघ फसवणूक करीत असल्याचे म्हटले आहे. अॅथलिट््सची डोपिंग चाचणी होत असलेली रशियातील प्रयोगशाळा विश्वासपात्र नाही, असेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
तीन सदस्यांचा समावेश असलेल्या आयोगाचे अध्यक्ष वाडाचे माजी प्रमुख रिचर्ड पाऊंड यांनी म्हटले, आहे की आम्ही विचार केला त्यापेक्षा येथील परिस्थिती चिंताजनक आहे.
समितीने विश्व अॅथलेटिक्स संघटनेला (आयएएएफ) रशियन अॅथलेटिक्स महासंघावर निलंबनाची कारवाई करण्याचा आग्रह केला आहे. त्याचसोबत रशियन अॅथलेटिक्स महासंघाला डोपिंगच्या नियमांचे पालन न करणारा महासंघ म्हणून घोषित करावे, अशी सूचना केली आहे.
आयएएएफ परिषदेची शुक्रवारी बैठक होणार असून, त्यात आॅलिम्पिकच्या या अव्वल क्रीडा प्रकारावर घोंघावत असलेल्या संकटावर चर्चा होणार आहे.
पुढील महिन्यात मोनाकोमध्ये होणाऱ्या आयएएएफच्या बैठकीमध्ये रशियावर अस्थायी स्वरूपाच्या निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
रशियन क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे, की वाडाच्या आयोगाच्या अहवालाचे आश्चर्य वाटले नाही. या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्हाला रशियन अॅथलेटिक्स महासंघाच्या (एआरएफ) अडचणींची माहिती असून आम्ही परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. आता एआरएफमध्ये नवे अध्यक्ष, नवे मुख्य प्रशिक्षक असून, कोचिंग स्टाफला नवे स्वरूप देण्यात येत आहे.
क्रीडा मंत्रालयाने पुढे म्हटले आहे, की रशिया खेळातील डोपिंगविरोधी लढाईमध्ये सहभागी आहे. एआरएएफचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणाले, की महासंघ आयएएएफला उत्तर देण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी वाढवण्याची मागणी करणार आहे.
वाडाच्या आयोगाने रशियाच्या पाच खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्याची शिफारस केली आहे. त्यात ८०० मीटर शर्यतीची आॅलिम्पक चॅम्पियन मारिया सेव्हिनोव्हाचाही समावेश आहे. डोपिंग करणाऱ्या खेळाडूंच्या समावेशामुळे लंडन २०१३ च्या आॅलिम्पिक स्पर्धेला नुकसान सोसावे लागले होते, असेही आयोगाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)