प्रदीपमध्ये दोन्ही हाताने गोलंदाजी करण्याची अनोखी कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:29 IST2015-12-28T03:29:03+5:302015-12-28T03:29:03+5:30
क्रिकेट या खेळात एकापेक्षा एक प्रतिभाशाली खेळाडू पाहायला मिळतात. प्रदीप चंपावतदेखील गुजरातचा असा एक खेळाडू आहे.

प्रदीपमध्ये दोन्ही हाताने गोलंदाजी करण्याची अनोखी कला
अहमदाबाद : क्रिकेट या खेळात एकापेक्षा एक प्रतिभाशाली खेळाडू पाहायला मिळतात. प्रदीप चंपावतदेखील गुजरातचा असा एक खेळाडू आहे. प्रदीपमध्ये दोन्ही हाताने सहा वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकण्याची अनोखी कला आहे.
अहमदाबादचा प्रदीप दोन्ही हाताने गोलंदाजी करतो आणि अचूक टप्प्यावर तो वेगवेगळ्या पद्धतीने सहा चेंडू टाकतो. या अद्भुत कलेचा धनी असणाऱ्या प्रदीपला लहानपणी याचा अंदाज नव्हता; परंतु क्रिकेटमध्ये सातत्याने प्रयोग करण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याने दोन्ही हाताने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि यशही मिळवले.
स्थानिक सामन्यात उजव्या हाताने गोलंदाजी करताना खूप महागडा ठरत असल्यामुळे प्रदीपने पंचांची परवानगी घेऊन डाव्या हाताने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि त्याला पहिल्याच चेंडूवर यश मिळाले. दोन्ही हाताने गोलंदाजी करण्याच्या कौशल्याचा प्रयोग करताना प्रदीपने अनेक फलंदाजांना आपली शिकार बनवले. प्रदीप स्थानिक सामन्यात पंचांची भूमिका बजावतो तसेच गुणलेखनही करतो. आयपीएलसाठी खेळलेला राहुल तेवातियादेखील दोन्ही हाताने गोलंदाजी करण्याची क्षमता बाळगून आहे. प्रदीप आंतरराष्ट्रीय क्रिकेटर नाही; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील अशा प्रकारची किमया अनेक खेळाडूंनी दाखवली आहे. आॅस्ट्रेलियातील दिग्गज फलंदाजांपैकी एक असणाऱ्या माईक हसीनेदेखील त्याच्या खेळाची सुरुवात उजव्या हाताचा फलंदाज म्हणून केली होती; परंतु अॅलन बॉर्डरमुळे प्रभावित होऊन तो डाव्या हाताचा फलंदाज बनला.