उमेशने चांगली सुरुवात केली : गंभीर

By Admin | Updated: May 6, 2015 02:54 IST2015-05-06T02:54:38+5:302015-05-06T02:54:38+5:30

गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर सोमवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध ३५ धावांनी विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली.

Umesh started well: serious | उमेशने चांगली सुरुवात केली : गंभीर

उमेशने चांगली सुरुवात केली : गंभीर

कोलकाता : गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर सोमवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध ३५ धावांनी विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली. पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा वेगवान गोलंदाज उमेश यादवची गंभीरने विशेष प्रशंसा केली.
गंभीर म्हणाला, ‘‘सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय साकारता आला. या खेळपट्टीवर १६०-१६५ धावा पुरेशा होत्या; पण त्यानंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून सामन्याचे पारडे आमच्या बाजूने झुकवले. गोलंदाजांनी अचूक मारा केला. आंद्रे रसेल जर लवकर बाद झाला नसता, तर आम्हाला १८०पर्यंत मजल मारता आली असती. फिरकीपटूंची कामगिरीही उल्लेखनीय ठरली.’’
गंभीरने वेगवान गोलंदाज उमेश यादवची प्रशंसा करताना म्हटले, ‘‘उमेशने आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने सनरायझर्स संघाच्या पहिल्या दोन विकेट सुरुवातीच्या षटकात माघारी परतवल्या. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली आला. त्यानंतर अन्य गोलंदाजांनी अचूक मारा करून दडपण कायम राखले.’’ गंभीर पुढे म्हणाला, ‘‘आम्ही सुरुवातीला फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता.
तीन फिरकीपटूंचा समावेश असलेला आमचा संघ लक्ष्याचा बचाव करण्यात यशस्वी ठरेल, असा आम्हाला विश्वास होता.’’
पहिल्याच षटकात दोन बळी घेऊन ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरलेला उमेश यादव म्हणाला, ‘‘डेव्हिड वॉर्नरचा बळी आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता. प्रतिस्पर्धी संघावर सुरुवातीपासून वर्चस्व गाजविणे आवश्यक होते. वॉर्नरला रोखण्यासाठी आम्ही विशेष योजना आखली होती व त्यात यशस्वी ठरलो.’’
उमेश पुढे म्हणाला, ‘‘मी सध्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले असून, गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. वेगवान गोलंदाज असल्यामुळे योजनाबद्ध मारा करणे आवश्यक असते आणि चेंडूची दिशा स्वत:च निश्चित करावी लागते.’’ उमेशने ४ षटकांत ३४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले.
(वृत्तसंस्था)

Web Title: Umesh started well: serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.