विजयाची कास धरण्यास उभय संघ उत्सुक

By Admin | Updated: April 18, 2016 02:49 IST2016-04-18T02:49:15+5:302016-04-18T02:49:15+5:30

खेळाडूंच्या दुखापती व कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला सनरायझर्स हैदराबाद संघ आणि संमिश्र कामगिरी करणारा विद्यमान चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ

The two teams look forward to winning the victory | विजयाची कास धरण्यास उभय संघ उत्सुक

विजयाची कास धरण्यास उभय संघ उत्सुक

मुंबई-हैदराबाद आज लढत : सनरायझर्सला दुखापतग्रस्त खेळाडूंची चिंता

हैदराबाद : खेळाडूंच्या दुखापती व कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला सनरायझर्स हैदराबाद संघ आणि संमिश्र कामगिरी करणारा विद्यमान चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ यांच्यादरम्यान उद्या (सोमवारी) आयपीएलच्या नवव्या पर्वात लढत होणार आहे. या लढतीच्या निमित्ताने उभय संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहेत.
आघाडीचे खेळाडू युवराजसिंग, केन विल्यमसन व आशिष नेहरा दुखापतग्रस्त असल्यामुळे हैदराबाद संघ कमकुवत झाला आहे. हैदराबाद संघाला पहिल्या दोन्ही लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हैदराबाद संघाचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ४५ धावांनी तर कोलकाता नाइट रायडर्सने ८ गडी राखून पराभव केला आहे.
सनरायझर्स संघाची भिस्त बऱ्याचअंशी कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या कामगिरीवर अवलंबून आहे. या व्यतिरिक्त आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी धवन, मोझेस हेन्रिक्स, मॉर्गन, दीपक हुडा व ओझा यांनाही मोठी भूमिका बजवावी लागणार आहे. गोलंदाजीमध्ये संघाला फॉर्मात असलेल्या नेहराची उणीव भासत आहे. सनरायझर्सला भुवनेश्वरकुमार, मुस्तफिझूर रहमान, कर्ण शर्मा, अभिमन्यू मिथुन व बरिंदर सरन या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे.
मुंबई इंडियन्सचा विचार करता त्यांना आतापर्यंत तीनपैकी केवळ एका लढतीत विजय मिळवता आला. मुंबई इंडियन्स संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. मुंबई इंडियन्सला सलामी लढतीत आयपीएलचा नवा संघ रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सने केकेआरविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. पण शनिवारी त्यांना गुजरात लायन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. केकेआरविरुद्ध नाबाद ८४ धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा चमकदार कामगिरीची आशा आहे. याव्यतिरिक्त बिग हिटर किरॉन पोलार्ड व इंग्लंडचा जोस बटलर यांनाही चमकदार कामगिरी करावी लागेल. अंबाती रायुडू, हार्दिक पंड्या व पार्थिव पटेल यांच्याकडूनही उपयुक्त योगदान अपेक्षित आहे. गोलंदाजीमध्ये मुंबई इंडियन्सची भिस्त मिशेल मॅक्लेनघन, हरभजनसिंग, टीम साउदी व जसप्रीत बुमराह यांच्यावर अवलंबून आहे.
सनरायझर्स संघासाठी सलग दोन पराभवानंतर विजय मिळवणे गरजेचे आहे. संघाचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनी संघ दमदार पुनरागमन करण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे.

उभय संघ यातून निवडणार
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, लेंडल सिमन्स, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लनघन, अक्षय वाखरे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जे. सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या व जितेश शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), युवराजसिंग, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वरकुमार, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, इआॅन मॉर्गन, मुस्तफिझूर रहमान, आदित्य तरे, बरिंदर सरन, के. एल. राहुल, मोझेस हेन्रिक्स, परवेझ रसूल, केन विल्यमसन, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, आशिष रेड्डी, विपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, रिकी भुई, बेन कटिंग, विनय शंकर, आशिष नेहरा व टी. सुमन

Web Title: The two teams look forward to winning the victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.