दुस-या डावाच्या प्रारंभीच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के
By Admin | Updated: February 24, 2017 14:01 IST2017-02-24T09:51:13+5:302017-02-24T14:01:20+5:30
भारताचा पहिला डाव 105 धावात गुंडाळणा-या ऑस्ट्रेलियालाही चांगली सुरुवात करता आलेली नाही.

दुस-या डावाच्या प्रारंभीच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 -भारताचा पहिला डाव 105 धावात गुंडाळणा-या ऑस्ट्रेलियालाही चांगली सुरुवात करता आलेली नाही. धावफलकावर संघाच्या 25 धावा लागण्याआधीच त्यांचे दोन फलंदाज तंबूत परतले. सलामीवीर डेविड वॉर्नरला अश्विनने 10 धावांवर पायचीत केले. त्यानंतर शॉन मार्शला भोपळाही फोडू न देता अश्विनने पायचीत केले. आता कर्णधार स्मिथ आणि हँडस्काँबची जोडी मैदानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज ओकेफीच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. भारताचा पहिला डाव 105 धावात आटोपला. पहिल्या डावात 260 धावा करणा-या ऑस्ट्रेलियाकडे 155 धावांची आघाडी आहे. ओकेफीने सर्वोत्तम कामगिरी करताना 35 धावात सहा गडी बाद केले.
सलामीवीर लोकेश राहुलचा (64) अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. 45 धावांच्याआत भारताने तीन फलंदाज तंबूत परतल्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य राहाणेने अर्धशतकी भागीदारी रचली.
दोघे भारताचा डाव सावरणार असे वाटत असतानाच ओकेफीच्या गोलंदाजीवर राहुलने वॉर्नरकडे सोपा झेल दिला. त्याने (64) धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर भारताची घसरगुंडी उडाली. त्याच षटकात अजिंक्य राहाणे (13), वृद्धीमान सहा (0) बाद झाले. पुढच्याच षटकात अश्विनला (1) रन्सवर लेयॉनने बाद केले. जयंत यादवही आल्यापावली माघारी परतला. (2) धावांवर ओकेफीच्या गोलंदाजीवर तो यष्टीचीत झाला.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 260 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताची सुरुवातही समाधानकारक झाली नाही. अवघ्या 45 धावांच्या आत भारताचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले आहेत. सलामीवीर मुरली विजयला (10) धावांवर हेझलवूडने वाडेकरवी झेलबाद केले.
चेतेश्वर पूजारा आणि कर्णधार विराट कोहली लागोपाठ बाद झाले. स्टार्सच्या गोलंदाजीवर पूजाराने (6) धावांवर वाडेकडे झेल दिला. स्टार्सने विराटला भोपळाही फोडू न देता हँडस्काँबकरवी झेलबाद केले. आता लोकेश राहुल आणि अजिंक्य राहाणेची जोडी मैदानावर आहे.
पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवणा-या भारताने दुस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच 260 धावांवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपुष्टात आणला. गुरुवारच्या धावसंख्येत आणखी 4 धावांची भर घातल्यानंतर मिचेल स्टार्सला अश्विनने जाडेजाकरवी झेलबाद केले.
आणखी वाचा
रेनशॉ नंतर त्याने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 61 धावा केल्या. भारताकडून भेदक मारा करणा-या उमेश यादवने सर्वाधिक चार, आर.अश्विनने तीन, रविंद्र जाडेजाने दोन आणि जयंत यादवने एक गडी बाद केला. भारताकडून लोकेश राहुल आणि मुरली विजय ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे.