मंत्रालयात ठरली दोन नावे!

By Admin | Updated: October 25, 2015 04:34 IST2015-10-25T00:45:00+5:302015-10-25T04:34:58+5:30

राज्याच्या क्रीडा क्षेत्रात आपले आयुष्य घालविणाऱ्या विविध खेळातील क्रीडा संघटकांना देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारर्थींची नावे अंतिम बैठक न घेताच क्रीडा मंत्रालयातून

Two names in the Ministry! | मंत्रालयात ठरली दोन नावे!

मंत्रालयात ठरली दोन नावे!

खेळखंडोबा ‘जीवनगौरव’चा : अंतिम बैठक न होताच शिक्कामोर्तब

पुणे : राज्याच्या क्रीडा क्षेत्रात आपले आयुष्य घालविणाऱ्या विविध खेळातील क्रीडा संघटकांना देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारर्थींची नावे अंतिम बैठक न घेताच क्रीडा मंत्रालयातून निश्चित करण्यात आल्याची माहिती पुढे आली
आहे. मंत्रालयातूनच नावे
निश्चित करायची होती, तर बैठकीचा देखावा कशाला केला, असा सवाल क्रीडा क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे.
राज्याच्या क्रीडा विभागाच्या वतीने २०१२-१३ आणि १३-१४ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये जीवनगौरव पुरस्काराची यादी अंतिम बैठक न होता मंत्रालयस्तरावरून जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्यातील एका क्रीडा उपसंचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार १० आॅगस्ट रोजी मुंबईत क्रीडामंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत जीवनगौरव पुरस्कार
यादीला अंतिम स्वरूप देण्यात
आले नाही. क्रीडा खात्याने १९ संघटकांच्या नावांच्या शिफारसीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यातून पाच नावे निश्चित करण्यात आली.
त्यापैकी दोन नावांवर विचार होणे अपेक्षित होते. क्रीडामंत्र्यांनी १० आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत जीवनगौरवची यादी आपण अंतिम बैठक घेऊन चर्चा करून निश्चित करू, असे सांगितले होते. त्यामुळे या बैठकीत जीवनगौरव पुरस्काराच्या नावांबाबत अंतिम निर्णय झालेला नव्हता.
मात्र त्यानंतर अचानक दसऱ्याच्या पूर्वसंध्येला छत्रपती पुरस्कारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा खात्याला मिळाली. जीवनगौरव पुरस्काराबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा मंत्रालयस्तरावर ती नावे निश्चित झाली असल्याचे सांगण्यात आले. मात्र ती नावे कोणाची, हे मात्र गुलदस्त्यात होते. या उपसंचालकाने असे सुध्दा सांगितले की, एकूण १९ प्रस्तावित नावांमधून
जी पाच नावे निश्चित त्यात
पहिल्या क्रमांकावर प्रल्हाद सावंत (पुणे), दुसऱ्या क्रमांकावर गणपतराव माने (लातूर), तिसऱ्या क्रमांकावर वीरभद्र रेगळ (सोलापूर), सीताराम भोतमांगे (नागपूर) आणि पाचव्या क्रमांकावर रमेश विपट (पुणे) यांचे नावे होते. पुरस्कारासाठी अध्यादेशानुसार क्रीडा विभागाच्या आठ विभागांकडून नावे मागविली जातात. त्यातून दोन नावांना अंतिम मंजूरी दिली जाते. मात्र जीवनगौरव पुरस्कारासाठी अंतिम बैठकीविनाच नावांची निश्चिती करण्यात आली. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी क्रीडा मंत्र्यांना मोबाईलवरून अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (क्रीडा प्रतिनिधी)

जीवनगौरव पुरस्कार निवडीचे निकष
राज्यातील क्रीडा क्षेत्रात विविध क्रीडा संघटकांच्या माध्यमातून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा व शिबिरांचे आयोजन करणे, क्रीडा विषयक उपक्रम राबविणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच परीक्षा व शिबिरांचे आयोजन करणे, क्रीडा विषयक चर्चासत्र व परिसंवाद आयोजित करणे, असे निकष असून, वयाची पन्नाशी उलटलेल्या क्रीडा संघटकांच्या नावाचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो.

यापूर्वी जीवनगौरव पुरस्कार मिळालेले काही दिग्गज संघटक : कै. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी, कै. शिवाजीराव नलावडे, रमाकांत आचरेकर, हरी गणेश साने, बाळासाहेब लांडगे, नरहर व्यंकटेश पडसलगीकर, जोगिंदरसिंग बेदी, भीष्मराज बाम, प्रभाकर वैद्य, मधुकर दरेकर, सुभाष पिसे या दिग्गजांना देण्यात आलेला आहे. पण यंदाचा जीवनगौरव योग्य आहे का? अशी चर्चा राज्याच्या क्रीडाक्षेत्रात सुरू आहे.

यंदाचा जीवनगौरव पुरस्कार मेरीटप्रमाणे दिला गेलेला नाही. प्रल्हाद सावंत व विदर्भातील सीताराम भोतमांगे यांनी त्यांचे आयुष्य क्रीडाक्षेत्रासाठी वाहिले आहे. त्यामुळे या वर्षी त्या दोघांना पुरस्कार मिळायला हवा होता. क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्त्ववानांना पुरस्कारापासून डावलण्यात आले. इतके वरिष्ठ असतानासुद्धा त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला नाही. 
- बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सचिव

गणपतराव माने यांचे काम मोठे आहे. त्यांनी आयुष्य क्रीडा क्षेत्रासाठी वेचले आहे. दुसरा पुरस्कार कोणास दिला, ते कोण आहेत हे माहित नाही. कोणत्या क्षेत्रात अथवा खेळात काम करतात याचीदेखील मला कल्पना नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत काही सांगू शकत नाही. 
- अशोक दुधारे, छत्रपती पुरस्कार विजेते व क्रीडा संघटक 

या वर्षी जाहीर केलेल्या जीवनगौरव पुरस्कारार्थींच्या कार्याची शहानिशा होणे आवश्यक होते. जी नावे प्रस्तावात पुढे आली असतील, त्यात वरिष्ठ कोण आहेत, याचा विचार मंत्रालय स्तरावर व्हायला हवा होता. तसेच क्रीडा क्षेत्रातील त्या व्यक्तीचे काम किती आणि कसे आहे, हे पाहणे गरजेचे होते.
- शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते

 

Web Title: Two names in the Ministry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.