अव्वल बॅडमिंटनपटू मोमोटा अपघातातून बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 02:44 IST2020-01-14T02:44:19+5:302020-01-14T02:44:24+5:30
यासंदर्भात, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘२५ वर्षीय या स्टार खेळाडूच्या नाकाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच त्याच्या चेहऱ्याला जखम झाली आहे

अव्वल बॅडमिंटनपटू मोमोटा अपघातातून बचावला
क्वालालंपूर : जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल खेळाडू जपानच्या केंटो मोमोटा याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा वाहन चालक जागीच ठार झाला. मलेशिया मास्टर्स किताब जिंकल्यानंतर मोमोटा परतत होता. एका ट्रकने मामोटा याच्या गाडीला धडक दिली. गाडीने लगेच पेट घेतला. या घटनेत मोमोटा गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, मोमोटाने मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर काही तासांनीच विमानतळावर जात असताना हा अपघात झाला.
यासंदर्भात, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘२५ वर्षीय या स्टार खेळाडूच्या नाकाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच त्याच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. अपघातग्रस्त वाहनात एक साहाय्यक प्रशिक्षक, फिजिओ आणि बॅडमिंटन अधिकारी सुद्धा होते. त्यांना मात्र किरकोळ दुखापत झाली.’ मोमोटो याने रविवारी येथे डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनला २४-२२, २१-११ असे नमवून मलेशियन मास्टर्स जेतेपद पटकाविले होते. २०२० ची त्याची ही जबरदस्त सुरुवात होती. (वृत्तसंस्था)