भारतासाठी आज ‘करा वा मरा’
By Admin | Updated: October 11, 2016 04:35 IST2016-10-11T04:35:54+5:302016-10-11T04:35:54+5:30
एएफसीनंतर ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेतही पराभवाची मालिका कायम राखणाऱ्या १७ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघासाठी मंगळवारी

भारतासाठी आज ‘करा वा मरा’
पणजी : एएफसीनंतर ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेतही पराभवाची मालिका कायम राखणाऱ्या १७ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघासाठी मंगळवारी चीनविरुद्धचा सामना जिंकण्याचे मोठे आव्हान असेल. हा सामना भारतासाठी ‘करा वा मरा’ अशा स्वरूपाचा आहे. ब्रिक्स स्पर्धेत भारताने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे हा संघ विजयाच्या शोधात असेल. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ‘ड्रॉ’ करणाऱ्या चीनविरुद्ध भारतीय संघाला व्यूहरचनेत काहीसा बदल करावा लागेल. चीनचे तीन सामन्यांतून
एक गुण आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला अजून खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे भारताला शर्यतीत कायम राहण्यासाठी उद्याचा सामना महत्त्वपूर्ण असेल.
याआधी, भारतीय संघाने रशिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांविरुद्ध अत्यंत जवळ आलेले सामने गमावले. त्यांनी बऱ्याच संधी मिळवल्या होत्या; मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय संघाला
गोल नोंदवण्यात अपयश आले. त्यामुळे संघाचे प्रशिक्षक निकोलई अॅडम आणि ‘सपोर्ट स्टाफ’ चिंतेत आहे.
भारताचे सहायक प्रशिक्षक इतिबार इब्र्राहिमोव म्हणाले की, आम्ही रशिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सामने खेळले आहेत. या सामन्यांत आम्ही जिंकू शकलो नसलो, तरी आम्ही बऱ्याच संधी मिळवत प्रतिस्पर्धी संघांच्या बचावास
व्यस्त ठेवले. आमचे खेळाडू संधीचा फायदा उठवू शकले नाहीत हीच चिंतेची बाब आहे.
आता आम्हाला चीनविरुद्ध महत्त्वपूर्ण सामना खेळायचा आहे. संधी मिळाल्यावर गोल केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे आवश्यक आहे. खेळावर अधिक लक्ष केंद्रित करून संधीचा फायदा उठवावा, हेच आम्ही खेळाडूंना सांगितले आहे.