इंग्लंड-अफगाणिस्तानमध्ये आज औपचारिक लढत
By Admin | Updated: March 13, 2015 00:47 IST2015-03-13T00:47:39+5:302015-03-13T00:47:39+5:30
विश्वचषकाच्या अ गटात खराब कामगिरी करणारे इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघ आधीच स्पर्धेबाहेर झाल्यानंतर उभय संघांत उद्या होणारी साखळी लढत

इंग्लंड-अफगाणिस्तानमध्ये आज औपचारिक लढत
सिडनी : विश्वचषकाच्या अ गटात खराब कामगिरी करणारे इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघ आधीच स्पर्धेबाहेर झाल्यानंतर उभय संघांत उद्या होणारी साखळी लढत केवळ औपचारिकता असेल. बांगलादेशाकडून इंग्लंड पराभूत झाला. अफगाणिस्तान संघ बांगलादेशाकडून प्रेरणा घेऊन समारोपाच्या सामन्यात सनसनाटी निर्माण करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. या सामन्याचा निकाल अ गटात तळाच्या स्थानावर कुठला संघ असेल, हे निश्चित करेल.
अॅडिलेड येथे सोमवारी बांगलादेशाने इंग्लंडला १५ धावांनी धूळ चारून स्पर्धेबाहेर ढकलले. इंग्लंडपुढे तळाच्या स्थानावर राहण्याची नामुष्की टाळण्यासाठी उद्या विजय मिळविण्याचे आव्हान असेल. या दोन्ही संघांनी केवळ स्कॉटलंडवर विजय मिळविला आहे. इंग्लंडला आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडूनही दारुण पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी इंग्लंडचे कोच पॉल फारब्रेस म्हणाले, ‘‘हा सामना गमावल्यास आमची स्थिती आणखी खराब होऊ शकते.’’
इंग्लंड-अफगाणिस्तान वन डेत प्रथमच परस्परांविरुद्ध खेळणार आहेत. अफगाणिस्तानचे कोच अॅण्डी मोल म्हणाले, ‘‘बांगलादेशाचा आदर्श आम्ही डोळ्यांपुढे ठेवू. तो सामना फारच अटीतटीचा झाला; पण इंग्लंडसाठी काहीही चांगले नव्हते. आमच्या संघाने तो सामना बारकाईने पाहिला आणि आपल्या चुकांचा अभ्यास केला. फलंदाजीत आमचे खेळाडू संयम राखून खेळल्यास उर्वरित काम गोलंदाज व क्षेत्ररक्षक पार पाडतील.’’ अफगाणिस्तानला आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडूनही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते; पण गोलंदाज हामीद हसन याच्या मते, इंग्लंडविरुद्ध खेळताना संघात भीतीचे वातावरण नाही. तो म्हणतो, ‘‘अफगाणी कधीही भीती बाळगत नाहीत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर अधिक सामन्यांचा अनुभव नसल्याने अनुभवहीनता अडथळा ठरू शकेल.’’ (वृत्तसंस्था)