टायटन्सने दिल्लीची ‘दबंगगिरी’ उतरवली

By Admin | Updated: July 19, 2015 22:11 IST2015-07-19T22:11:44+5:302015-07-19T22:11:44+5:30

तेलगू टायटन्स संघाने अत्यंत शिस्तबध्द आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर प्रो-कबड्डीच्या दुसऱ्या सत्रामध्ये विजयी सलामी देताना दिल्ली दबंगचा ३६-२७ असा फडशा पाडला

Titans removed Dabanggiri from Delhi | टायटन्सने दिल्लीची ‘दबंगगिरी’ उतरवली

टायटन्सने दिल्लीची ‘दबंगगिरी’ उतरवली

रोहित नाईक , मुंबई
तेलगू टायटन्स संघाने अत्यंत शिस्तबध्द आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर प्रो-कबड्डीच्या दुसऱ्या सत्रामध्ये विजयी सलामी देताना दिल्ली दबंगचा ३६-२७ असा फडशा पाडला. दुसरीकडे पराभूत झालेल्या दिल्ली संघाकडून सुरुवातीपासून नियोजनाचा अभाव दिसून आला. त्यांचे सगळे प्रमुख खेळाडू सपशेल अपयशी ठरल्याने दिल्लीची सगळी ‘दबंगगिरी’ उतरली.
तेलगू संघाचा कर्णधार राहूल चौधरीने सामन्यातील पहिला गुण जिंकताना संघाचे खाते उघडले आणि त्या क्षणापासून तेलगू संघाने वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. संदीप व दीपक हूडा यांनी मजबूत पकडी करताना राहूलला चांगली साथ दिल्याने तेलगूने आघाडी वाढवली. दिल्लीकडून रोहित चौधरीने झुंजार अष्टपैलू खेळी करत तेलगूला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला.
यानंतर तेलेगूने गुणांचा धडाका लावत ११व्या मिनिटाला दिल्ली संघावर लोण चढवून सामना १३-५ असा आपल्या बाजूने झुकवला. तेलगूच्या सुकेश हेगडेने आक्रमक चढाई करताना दिल्लीच्या जीएस मनीकांदन व रविंदर सिंग पहल यांना बाद करुन दिल्लीची आघाडी १६-६ अशी वाढवली. मध्यंतराला तेलगूने १८-८ अशी तब्बल १० गुणांची अघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला.
मध्यंतरानंतर देखील सामन्यात फारसा काही बदल दिसला नाही. तेलगूने जबरदस्त सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली. त्याचवेळी दिल्लीचे सर्वच प्रमुख खेळाडूंवरील दबाव स्पष्टपणे दिसत होता. काशिलिंग, कर्णधार जसमेर सिंग, राकेश कुमार यांसारखे सर्वच प्रमुख खेळाडू अपयशी ठरले. २८व्या मिनिटाला पुन्हा एकदा तेलगूने दुसरा लोन चढवून २६-१४ अशी एकतर्फी आघाडी घेऊन दिल्लीची हवाच काढली. दीपक हूडा व संदीप यांचा शानदार अष्टपैलू खेळाडू, मिराज शेखचा भक्कम बचाव आणि कर्णधार राहूल, सुकेश हेगडे यांची आक्रमक चढाई तेलगूच्या विजयात
निर्णायक ठरले. दिल्लीकडून कर्णधार जसमेर, काशीलिंग व रोहित यांनी झुंजार खेळ केला.

Web Title: Titans removed Dabanggiri from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.