त्या वेळी चंद्रशेखरने घेतले होते १२ बळी
By Admin | Updated: February 26, 2017 23:52 IST2017-02-26T23:52:41+5:302017-02-26T23:52:41+5:30
आॅस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकीपटू स्टीव्ही ओकिफीसारखा पराक्रम एका दिग्गज भारतीय फिरकीपटूने जवळजवळ ४० वर्षांपूर्वी केलेला आहे.

त्या वेळी चंद्रशेखरने घेतले होते १२ बळी
नवी दिल्ली : भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात १२ बळी घेणारा आॅस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकीपटू स्टीव्ही ओकिफीसारखा पराक्रम एका दिग्गज भारतीय फिरकीपटूने जवळजवळ ४० वर्षांपूर्वी केलेला आहे. विशेष म्हणजे, त्या गोलंदाजाने हा पराक्रम आॅस्ट्रेलियाच्या मेलबोर्न क्रिकेट मैदानावर केला होता. त्या गोलंदाजाचे नाव आहे भागवत चंद्रशेखर.
भारताचे माजी लेग स्पिनर चंद्रशेखर यांनी १९७७-१९७८ मध्ये मेलबोर्न कसोटीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात ५२ धावांच्या मोबदल्या ६, तर दुसऱ्या डावात ५२ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते. चंद्रशेखर यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने त्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.(वृत्तसंस्था)
>ओकिफी ३५-६, ३५-६
तीन दिवसांमध्ये संपलेल्या पुणे कसोटी सामन्यात ओकिफीने पहिल्या डावात ३५ धावांच्या मोबदल्या ६, तर दुसऱ्या डावातही ३५ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. एका गोलंदाजाने दोन्ही डावांत सारख्याच धावा बहाल करताना ६ बळी घेण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही.
>त्या वेळी २२२ आणि आता ३३३
ओकिफीच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने भारताचा ३३३ धावांनी पराभव केला, तर १९७७-१९७८ मध्ये भागवत चंद्रशेखर यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने आॅस्ट्रेलियाचा २२२ धावांनी पराभव केला होता.
>तीन दिवसांत गमावला कसोटी सामना
पुणे कसोटी सामन्यात भारताला केवळ तीन दिवसांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. मायदेशात तीन दिवसांमध्ये कसोटी सामना गमावण्याची भारताची ही पाचवी वेळ आहे.
१९५१-५२ (कानपूर) - इंग्लंडविरुद्ध ८ गड्यांनी पराभूत.
१९९९-२००० (मुंबई) - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ गड्यांनी पराभूत.
२०००-२००१ (मुंबई) - आॅस्ट्रेलियाविरुद्ध १० गड्यांनी पराभूत.
२००७-०८ (अहमदाबाद) - द. आफ्रिकेविरुद्ध एक डाव ९० धावांनी पराभूत.
२०१६-१७ (पुणे) - आॅस्ट्रेलियाविरुद्ध ३३३ धावांनी पराभूत.