टीम इंडियाचा कसून सराव
By Admin | Updated: October 7, 2016 02:48 IST2016-10-07T02:48:07+5:302016-10-07T02:48:07+5:30
भारतीय क्रिकेट संघाने शनिवारपासून न्यूझीलंडविरुद्ध येथील होळकर स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी गुरुवारी कसून सराव

टीम इंडियाचा कसून सराव
इंदूर : भारतीय क्रिकेट संघाने शनिवारपासून न्यूझीलंडविरुद्ध येथील होळकर स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी गुरुवारी कसून सराव केला. पाहुण्या न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंनीही आज सरावादरम्यान चांगला घाम गाळला.
त्याआधी, बुधवारी रात्री देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर उभय संघाचे पावसाने स्वागत केले. दोन्ही संघांतील खेळाडूंचे निवास व्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (एमपीसीए) सचिव मिलिंद कनमडीकर यांनी सांगितले की, उभय संघ स्थानिक महाराणी उषाराजे होळकर स्टेडियममध्ये वेगवेगळ्या वेळी सराव करणार आहेत. एमपीसीएने या लढतीसाठी सर्व तयारी केलेली आहे. सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय निर्माण झाला तर एमपीसीएकडे सुपर सॉपरची सोय असून पूर्ण मैदानासाठी कव्हर उपलब्ध आहेत. इंदूरमध्ये बुधवारी दुपारीपासून थांबून-थांबून पाऊस सुरू आहे. मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी सुपर सॉपरचा वापर करण्यात आला.’
दरम्यान, हवामान खात्याने इंदूरमध्ये सलग तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे ६, ७ आणि ८ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने ९ ते १२ आॅक्टोबर या कालावधीत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. क्रिकेट चाहत्यांची गर्दी लक्षात घेता पोलीस विभागाने स्टेडियम व हॉटेलच्या परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. हॉटेल ते स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
मायदेशातील कसोटी सामन्यात
गंभीरची भूमिका महत्त्वाची : संजय बांगर
च्के. एल. राहुल आणि शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे गौतम गंभीर पुन्हा एकदा कसोटी खेळण्याची शक्यता बळावली आहे. मायदेशात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये दिल्लीच्या या फलंदाजाची भूमिका महत्त्वाची ठरेल, अशी प्रतिक्रिया भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केली.
च्राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे गंभीरचे जवजवळ दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. कोलकाता कसोटीत त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नाही; पण धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे आता शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या कसोटीत त्याला खेळवण्याशिवाय संघाकडे दुसरा पर्याय शिल्लक नाही.
च्बांगर म्हणाला, ‘गंभीर महत्त्वाचा खेळाडू आहे. संघाबाहेर असताना त्याने आयपीएल फ्रँचायझी व राज्य संघातर्फे चमकदार कामगिरी केली. त्यानंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याला संधी मिळाली. तेथे तो सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज ठरला. गुलाबी चेंडूने खेळताना त्याने या धावा फटकावल्या आहेत. अन्य फलंदाजांना गुलाबी चेंडूने खेळताना अडचण भासत असताना गंभीर मात्र कमालीचा यशस्वी ठरला.’
बांगर पुढे म्हणाला, ‘के. एल. राहुल व शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे माझ्या मते गंभीरसाठी संघात स्थान निर्माण झाले आहे. त्याने फिरकी गोलंदाजांविरुद्ध स्वत:ला सिद्ध केले आहे. सध्या भारतात खेळण्यात येणाऱ्या आगामी कसोटी सामन्यांचा विचार करता गंभीर आघाडीच्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू आहे.’
भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंड, बांगलादेश (एक कसोटी) आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायच्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांत कर्णधार विराट कोहलीला फलंदाजीमध्ये विशेष छाप सोडता आली नाही. कर्णधाराचे अपयश चिंतेचा विषय नसल्याचे सांगताना बांगर म्हणाला, ‘विराटने विंडीज दौऱ्यात चमकदार कामगिरी केली. तेथे त्याने द्विशतक झळकावले. जमैकामध्येही त्याने शानदार फलंदाजी केली तर त्रिनिदादची लढत पावसामुळे रद्द झाली. कोलकातामध्ये त्याने केलेली ४५ धावांची खेळी सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती. भारताची दुसऱ्या डावात ४ बाद ४५ अशी नाजूक अवस्था होती. त्या वेळी विराटने रोहितच्या साथीने डाव सावरला. ’
बांगर पुढे म्हणाला, ‘अनेकदा जेवढ्या धावा फटकावल्या पाहिजे तेवढ्या फटकावल्या जात नाही; पण छोटी खेळीही उपयुक्त ठरते. विराटच्या बाबतीत तेच घडत आहे. तो मोठी खेळी करण्यास उत्सुक आहे. सध्याच्या संघातील खेळाडू १२ ते १५ महिन्यांपासून एकत्र कसोटी मालिका खेळत आहे. त्यांना आपल्या क्षमतेवर विश्वास आहे. आम्ही कुठल्याच स्थितीत पराभवाबाबत विचार करीत नाही. भारताने या मालिकेत विजयी आघाडी घेतली असली तरी अखेरच्या लढतीतही आम्ही विजय मिळवण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरणार आहोत.’ (वृत्तसंस्था)