तगड्या न्यूझीलंडला बांगलादेशाने झुंजविले
By Admin | Updated: March 14, 2015 01:08 IST2015-03-14T00:18:04+5:302015-03-14T01:08:42+5:30
सलामीवीर मार्टिन गुप्तिलच्या (१०५ धावा) शतकानंतरही न्यूझीलंडला विश्वचषकाच्या ‘अ’ गटात अखेरच्या साखळी लढतीत शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध

तगड्या न्यूझीलंडला बांगलादेशाने झुंजविले
हमिल्टन : सलामीवीर मार्टिन गुप्तिलच्या (१०५ धावा) शतकानंतरही न्यूझीलंडला विश्वचषकाच्या ‘अ’ गटात अखेरच्या साखळी लढतीत शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध विजयासाठी अक्षरश: संघर्ष करावा लागला. सात चेंडू आणि तीन गड्यांनी सरशी साधण्यासाठी यजमान संघाने बराच घाम गाळला. बांगलादेशने ५० षटकांत ७ बाद २८८ धावा उभारल्या. न्यूझीलंड संघाला हे लक्ष्य गाठण्यासाठी ४८.५ षटके खेळावी लागली. त्यांनी ७ बाद २९० धावा करीत सामना जिंकला.
महम्मदुल्लाहच्या १२८ धावा आणि शाकिब अल हसनने ५५ धावांत घेतलेल्या चार बळींमुळे बांगलादेशने विजयाच्या दारात पाय ठेवला होता; पण काही चुका त्यांनाही नडल्या. न्यूझीलंडच्या सहाव्या विजयाचे हिरो गुप्तिल १०५ व रॉस टेलर ५६ हे ठरले. ही लढत अखेरपर्यंत रोमहर्षक बनली होती. डॅनियल व्हेट्टोरी नाबाद १६ आणि टिम साऊदी नाबाद १२ यांनी आठव्या गड्यासाठी नाबाद २१ धावांची भागीदारी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशकडून शाकिबच्या चार बळींशिवाय नासिर हुसेन याने ३२ धावांत दोन आणि रुबेल हुसेन याने ४० धावा देत एक गडी बाद केला.
बांगलादेशकडून महम्मदुल्लाहने १२८, सौम्या सरकार ५१ आणि साबिर रहमान ४० यांनी उपयुक्त खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट, कोरी अॅण्डरसन आणि इलियट यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. कर्णधार शाकिब २३; तसेच मुशफिकूर रहीम १५ हे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर बाद झाले. सबीर रहमानने ४० धावांच्या खेळीत पाच चौकार व दोन षटकार खेचले. सबीर-महम्मदुल्लाह यांनी सहाव्या गड्यासाठी ७८ धावांची भागीदारीही केली. बांगलादेशचा अखेरचा गडी नासिर हुसेनच्या रूपात बाद झाला. त्याला ११ धावांवर इलियटने जाळ्यात अडकविले. मात्र, महम्मदुल्लाहने एक टोक सांभाळून धावसंख्येला आकार दिला. त्याने १२३ चेंडू टोलवित १२ चौकार व तीन षटकारांसह नाबाद १२८ धावांची दमदार खेळी केली.
न्यूझीलंडचे दोन गडी ३३ धावांत बाद झाले होते. मॅक्यूलम ८ आणि केन विलियम्सन याने एक धाव केली. गुप्तिलने मात्र शंभर चेंडूंत ११ चौकार व दोन षटकारांसह १०५ धावा ठोकल्या. हे त्याचे सहावे वन डे शतक होते. टेलरने मंदगती फलंदाजीचा विक्रम नोंदवित ९७ चेंडूंत ५६ धावांचे योगदान दिले. गुप्तिल- टेलर यांनी तिसऱ्या गड्यासाठी १३१ धावांची भागीदारी केली.