‘त्या’ तिघींची प्रकृती स्थिर
By Admin | Updated: May 9, 2015 00:43 IST2015-05-09T00:43:29+5:302015-05-09T00:43:29+5:30
केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये वरिष्ठांच्या छळाला कंटाळून

‘त्या’ तिघींची प्रकृती स्थिर
नवी दिल्ली : केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये वरिष्ठांच्या छळाला कंटाळून सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या तिघी महिला अॅथलिटची प्रकृती गंभीर असली, तरी स्थिर आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेडिकल बोर्डची स्थापना केली आहे.
केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या तिघींचा जीव वाचविणे हे आमचे प्राथमिक लक्ष्य आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेडिकल बोर्ड स्थापन करण्यात आले आहे.
केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये वॉटर स्पोर्ट्सचे प्रशिक्षण घेत असलेल्या चार मुलींनी विष प्राशन केले होते. यातील १५ वर्षीय अपर्णा या मुलीचा मृत्यू झाला, तर इतर तिघींवर अलपुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या चौघींनी ‘ओथालांगा’ हे विषारी फळ खाल्ले होते. अलपुझा मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे अधिष्ठाता संतोष राघवन यांनी सांगितले की, तिघींची प्रकृती गंभीर असली, तरी स्थिर आहे. त्यांनी खाल्लेल्या ‘ओथालांगा’ या विषारी फळावर कोणतेही विषनाशक नाही, त्यामुळे उपचारांवर मर्यादा येत आहेत. तरीही आम्ही शर्तीचे प्रयत्न करीत आहोत. दरम्यान, केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी शुक्रवारी रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. या वेळी त्यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची ग्वाही दिली. (वृत्तसंस्था)