‘त्या’ भारतीय फलंदाजाची फिक्सिंगबाबत चौकशी करा
By Admin | Updated: February 27, 2015 00:36 IST2015-02-27T00:36:33+5:302015-02-27T00:36:33+5:30
जून २०१० मध्ये येथे झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान टीम इंडियातील एक ज्येष्ठ फलंदाज फिक्सिंगमध्ये गुंतला होता

‘त्या’ भारतीय फलंदाजाची फिक्सिंगबाबत चौकशी करा
कोलंबो : जून २०१० मध्ये येथे झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान टीम इंडियातील एक ज्येष्ठ फलंदाज फिक्सिंगमध्ये गुंतला होता. स्पर्धेदरम्यान या खेळाडूने डाम्बुला येथील एका हॉटेलमध्ये एका महिलेसह रात्रभर वास्तव्य केले. या महिलेचे सट्टेबाजांशी संबंध होते. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्याची विनंती श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) देशाचे नवे क्रीडामंत्री नवीन दिसनायके यांना पत्राद्वारे केली आहे.
एसएलसीच्या कार्यकारी समितीचे सदस्य शम्मी सिल्वा यांनी २० फेब्रुवारीला लिहिलेल्या या पत्रकात क्रीडामंत्र्यांना विनंती केली की, डाम्बुला येथे झालेल्या सामन्यादरम्यान एक भारतीय खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये गुंतला होता. या स्पर्धेत भारत, लंका, पाक आणि बांगला देश संघांचा समावेश होता.
याप्रकरणी सिल्वा यांनी ११ फेब्रुवारीला एसएलसी प्रमुख जयंत धर्मदासा यांनादेखील पत्र लिहिले. क्रीडामंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सिल्वा म्हणतात, ‘प्रकरण गंभीर असल्याने त्वरित चौकशी समिती स्थापन करावी. खासगी स्वार्थासाठी काम करणाऱ्या लोकांचा अनावश्यक हस्तक्षेप टाळण्यासाठी क्रीडा मंत्रालयाद्वारे प्रकरणाचा सखोल तपास व्हायला हवा.’
भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या न्या. मुकुल मुद्गल यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने एसएलसीकडे भारतीय क्रिकेटच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यास सादर करावेत, असे पत्र पाठविले होते. त्यावेळी एसएलसीने मुद्गल आयोगाला गुंगारा दिला होता. विशेष म्हणजे या प्रकरणाचा खुलासा मुद्गल आयोगानेच सर्वप्रथम केला होता. (वृत्तसंस्था)