भारतीय संघाचा तिसरा पराभव
By Admin | Updated: October 12, 2016 07:09 IST2016-10-12T07:09:34+5:302016-10-12T07:09:34+5:30
निर्धारित वेळेत ‘चायनिज वॉल’ला रोखल्यानंतर अतिरिक्त वेळेतील शेवटच्या मिनिटाला हुआंग कॉँग याने गोल नोंदवून भारतीयांना धक्का

भारतीय संघाचा तिसरा पराभव
पणजी : निर्धारित वेळेत ‘चायनिज वॉल’ला रोखल्यानंतर अतिरिक्त वेळेतील शेवटच्या मिनिटाला हुआंग कॉँग याने गोल नोंदवून भारतीयांना धक्का दिला. याच गोलच्या बळावर चीनने भारतीयांच्या आशेलाही धक्का दिला. १७ वर्षांखालील ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेतील भारताचा हा तिसरा पराभव होता. त्यामुळे स्पर्धेत कायम राहण्याच्या आशाही धूसर झाल्या आहेत. गुणतालिकेत भारतीय संघ शून्यावर, तर चीनने पहिला विजय नोंदवून ४ गुण मिळविले आहेत. आता भारताचा साखळी फेरीतील अंतिम सामना ब्राझीलविरुद्ध बुधवारी (दि. १२) होईल.
बांबोळी येथील जीएमसी मैदानावर झालेल्या या सामन्यात चीनचा बचाव आणि आघाडी भारतापेक्षा वरचढ होती. भारतीय खेळाडूंनी चीनपेक्षा अधिक वेळ चेंडूवर ताबा मिळविला. मात्र, डझनभर संधी मिळूनही त्यांना गोल करता आला नाही. २१व्या मिनिटाला भारताच्या कोमल थटालने संधी मिळविली होती; मात्र त्याचा हा फटका बचावटपटूंनी रोखला. मध्यंतराला तीन मिनिटांचा अवधी असताना अमरजितनेही संधी गमावली. ६८व्या मिनिटाला अभिजित सरकारकडे चेंडू आला होता. गोलपोस्टजवळ चीनचा बचावटूही नव्हता; मात्र त्याला गोलरक्षकाला चकवता आले नाही. ७७ आणि ७८व्या मिनिटांना भारताला सलग दोन कॉर्नर मिळाले होते. या दोन्ही कॉर्नरवर ‘चायनिज वॉल’ भेदण्यात भारत अपयशी ठरला. कर्णधार सुरेश सिंहने ही संधी वाया घालविली.८३व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर संजय स्टॅलिनने मारलेला फटका गोलपोस्टजवळून गेला आणि पुन्हा संधी हुकली. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व मिळविले होते. मात्र, त्यांना संधीचे सोने करता आले नाही.
बायचुंग भूतियाची हजेरी
ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेतील भारतासाठी ‘करा वा मरा’ अशा अवस्थेतील असलेला चीनविरुद्धचा सामना पाहण्यासाठी भारताचा माजी कर्णधार बायचुंग भूतिया खास उपस्थित होता सामन्याआधी त्याने खेळाडूंशी संवाद साधला. भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक असून, काही सुधारणा झाल्यास हा संघ अधिक मजबूत होईल, असे त्याने सांगितले.