‘पदार्पणाच्या वेळी यशाबाबत साशंकता होती’
By Admin | Updated: November 8, 2014 03:23 IST2014-11-08T03:15:32+5:302014-11-08T03:23:46+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळजवळ सर्वच विक्रमांवर नाव कोरणाऱ्या सचिन तेंडुलकरने ज्या वेळी वकार युनूस व वसीम अक्रम यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा समावेश

‘पदार्पणाच्या वेळी यशाबाबत साशंकता होती’
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळजवळ सर्वच विक्रमांवर नाव कोरणाऱ्या सचिन तेंडुलकरने ज्या वेळी वकार युनूस व वसीम अक्रम यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा समावेश असलेल्या पाकिस्तान संघाविरुद्ध १९८९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्या वेळी तो घाबरलेला होता. सचिनला त्या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याच्या क्षमतेवर साशंकता होती. प्रकाशित झालेले आत्मचरित्र ‘प्लेइंग इट माय वे’मध्ये सचिनने खुलासा केला आहे. कसोटी क्रिकेटमधील पहिला डाव किती कठीण होता, याचा सचिनने उल्लेख केला आहे.
परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दडपणाची कल्पना असलेल्या तेंडुलकरने सियालकोटमध्ये चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान वकारच्या गोलंदाजीवर कसा रक्तबंबाळ झालो याचे वर्णन केले आहे. याबाबत सचिनने म्हटले आहे, ‘मी धावांचे खाते उघडले होते. त्यानंतर वकारने बाउन्सर केला.
माझ्या अंदाजापेक्षा हा चेंडू अधिक उसळला आणि माझ्या हेल्मेटच्या फ्लॅपवरून नाकावर आदळला. त्यानंतर माझे डोके जड झाले आणि मला काहीच दिसत नव्हते. चेंडू स्लिपमध्ये गेला आणि मी चेंडू कुठे गेला हे शोधत होतो. त्याच वेळी मला माझ्या शर्टवर रक्त दिसले. मी या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना जावेद मियांदादच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटले. मियांदाद म्हणाला, ‘अरे तुला तर आता रुग्णालयात जावे लागणार, तुझे नाक मोडले आहे.’ प्रेक्षक गॅलरीतील एका बॅनरवर लिहिले होते, ‘बच्चा घर जाकर दूध पिके आ’ यामुळे मी अधिक निराश झालो होतो. सचिनने कराची कसोटीच्या आठवणीचा उल्लेख करताना म्हटले की, ‘कराची कसोटीमध्ये १६ वर्षांचा एक मुलगा केवळ घाबरलेला होता, असे नाही, तर त्या वेळी त्याला भारत-पाक क्रिकेटमधील भावनेचा उद्रेकही अनुभवयाला मिळाला. (वृत्तसंस्था)