...तर माझ्या घरावर दगड पडतील - आर.अश्विन
By Admin | Updated: April 8, 2017 13:15 IST2017-04-08T12:10:44+5:302017-04-08T13:15:20+5:30
भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज रविचंद्रन अश्विनने क्रिकेट, राजकारणापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर भाष्य केले आहे.

...तर माझ्या घरावर दगड पडतील - आर.अश्विन
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 8 - फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघाचा कर्दनकाळ बनणारा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज रविचंद्रन अश्विनने क्रिकेट, राजकारणापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर भाष्य केले आहे. आपल्या देशात कुठल्याही विषयावर मुक्तपणे बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही, त्यावर मर्यादा आहेत असे अश्विनने म्हटले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अश्विनने विविध विषयांवर भाष्य केले. मी मोकळेपणाने, स्पष्टपणे बोलतो पण त्यामुळे कधीतरी अडचणीत येईन अशी भिती वाटते. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीय. त्यावर मर्यादा आहेत असे अश्विनने सांगितले. ज्या क्षणाला मी काही राजकीय भाष्य करेन त्यावेळी माझ्या घरावर दगड फेकले जातील.
मला आणि माझ्या कुटुंबाला जमावाची भिती वाटते. मी आतापर्यंत चेन्नईत शांततेत, समाधानात राहिलो आहे आणि यापुढेही तसेच रहायचे आहे. ज्या देशाने मला सर्व काही दिले. ज्या देशावर माझे प्रेम आहे तो देश सोडून मला पळून जायचे नाही असे अश्विनने सांगितले. काही विषयांवर मी भूमिका घेतो म्हणून अनेक लोकांना मी आवडत नाही.
माझा चांगला उद्देश असतो पण काही लोक त्याचे राजकारण करतात. मी कमेंट करु नये असे आतापर्यंत हजारो लोकांनी मला सांगितले आहे. दुस-याने गप्प रहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि असेच जगणे आपल्या आयुष्यात भाग बनले आहे. हे असेच सुरु राहिले तर आपण देश म्हणून पुढे जाणार आहोत का ?, मी दुस-यांना असच करा हे सांगू शकत नाही पण माझ्या मनाला जे पटते, योग्य वाटते ते मी करतो असे अश्विनने सांगितले.
अश्विननने सोशल मीडियाच्या माध्यमातून जलिकट्टू पासून ते तामिळनाडूतल्या राजकारणावर आपली भूमिका मांडली आहे. माझ्या राज्यात भरपूर काही घडत आहे त्यावर कोणीतरी भूमिका घेतली पाहिजे . माझे राज्य दुस-यांसाठी हसण्याचा विषय बनू नये असे अश्विनने सांगितले. लहानपणीची वर्तमानपत्र वाचण्याची आठवणही अश्विनने यावेळी सांगितली. असत्य, सनसनाटी वगळून नेमकी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्याची जबाबदारी प्रिंट मीडियावर असल्याचे अश्विनने सांगितले.