हॉकी संघाची आज कसोटी
By Admin | Updated: October 6, 2015 01:12 IST2015-10-06T01:12:56+5:302015-10-06T01:12:56+5:30
न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध गेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळविल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला मंगळवारी यजमान न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाच्या आव्हानाला

हॉकी संघाची आज कसोटी
नेल्सन : न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध गेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळविल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला मंगळवारी यजमान न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
रिओ आॅलिम्पिक आणि एफआयएच वर्ल्ड लीग यांसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांच्या तयारीसाठी न्यूझीलंडमध्ये खेळत असलेल्या भारतीय संघाने यजमान ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवले आहेत, पण आता त्याची खरी परीक्षा राष्ट्रीय संघाविरुद्धच्या लढतीने होणार आहे. ही लढत नेल्सनमध्ये खेळली जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड पुरुष संघांदरम्यान यापूर्वी भारताच्या यजमानपदाखाली दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या हीरो हॉकी वर्ल्ड लीग फायनल्स २०१४ मध्ये अखेरची लढत झाली होती. त्या लढतीत न्यूझीलंडने विजय मिळवला होता. या लढतीला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. उभय संघ पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळण्यास सज्ज झाले आहेत. या लढतीच्यानिमित्ताने भारताला यजमान संघाला त्यांच्याच गृहमैदानावर पराभूत करीत हिशेब चुकता करण्याची संधी आहे.
दरम्यान, न्यूझीलंड संघाला स्थानिक प्रेक्षकांपुढे खेळण्याचा लाभ मिळणार आहे, तर भारतीय संघासाठी गेल्या दोन सामन्यांत मिळविलेला विजय प्रेरणादायी आहे. भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखत विजयाची हॅट््ट्रिक नोंदविण्यास उत्सुक आहे. भारतीय संघाने विजय महत्त्वाचा असून सुरुवातीला गोल नोंदविण्याची रणनीती या वेळीही बघायला मिळेल.
गेल्या सामन्यांमध्ये टीम इंडियाने याच रणनीतीचा वापर केला होता. सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघाच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत गोल नोंदविण्याच्या संधी निर्माण करणे आणि आघाडी मिळवणे भारताचे लक्ष्य राहील. एस. के. उथप्पा, आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील यांना पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. या महत्त्वाच्या लढतीबाबत हाय परफॉर्मन्स संचालक आणि पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलेंट ओल्टमेन्स म्हणाले, ‘‘यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांत आमची कामगिरी उल्लेखनीय ठरली. येथील परिस्थितीशी जुळवून घेण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त मैदानी गोल नोंदविण्यास आम्ही सक्षम असल्यामुळे सामन्याचा निकाल आमच्यासाठी अनुकूल ठरला. आम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारण्यात सक्षम असल्याची प्रचिती आली.