चोराचा पाठलाग करून टेनिससम्राज्ञी सेरेनाने परत मिळवला मोबाईल
By Admin | Updated: November 6, 2015 17:10 IST2015-11-06T16:48:53+5:302015-11-06T17:10:14+5:30
टेनिससम्राज्ञी सेरेना विल्यम्सने चोराचा पाठलाग करून आपला फोन परत मिळवला.

चोराचा पाठलाग करून टेनिससम्राज्ञी सेरेनाने परत मिळवला मोबाईल
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंगटन, दि. ६ - टेनिसकोर्टवर प्रतिस्पर्ध्यास कडवी झुंज देऊन अप्रतिम खेळ करणारी टेनिससम्राज्ञी सेरेना विल्यम्सने प्रत्यक्ष आयुष्यातही साहस दाखवत एका चोराचा पाठलाग करून आपला फोन परत मिळवला आहे. खेळाच्या मैदानाप्रमाणेच आपण आयुष्यातही कमी नसून, चोरांना घाबरत नाही असे सांगत 'सुपर सेरेना'ने तिच्या फेसबूक वॉलवर हा अनुभव कथन केला आहे.
झाले असे की काही दिवसांपूर्वी, सेरेना तिच्या मित्रांसह एका रेस्टॉरंटमध्ये चायनीज जेवणाचा आस्वाद घेत होती आणि तिने शेजारील खुर्चीवर तिचा मोबाईल ठेवला होता. मात्र त्यावेळीच शेजारच्या टेबलावर बसलेल्या एका इसमाला पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मित्रांशी गप्पा मारण्यात मग्न असलेल्या सेरेनाला शेजारच्या टेबलवरील तो माणूस आणि तिचा मोबाईल दोन्ही गायब झाल्याचे लक्षात आले. तो माणूस रेस्टॉरंटमूधन बाहेर पडताना सेरेनाने पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करत तिने दोन-तीन खुर्च्यांवरून उडी मारून त्या माणसाचा पाठलाग सुरू केला.
ते पाहून तो माणूस जोरात पळू लागला असता, सेरेनाने हार न मानता त्याचा पाठलाग सुरूच ठेवला आणि थोड्या अंतरावर त्याला गाठून त्याच्याकडून मोबाईल परत मिळवला. याप्रकरणी त्या व्यक्तीला सेरेनाने जाब विचारला असता, आपण नजरचुकीने दुसरा फोन उचलल्याचे सांगत त्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे सेरेनाने नमूद केले. आपला मोबाईल मिळवून रेस्टॉरंटमध्ये परत आलेल्या सेरेनाला पाहून उपस्थितांनी उभे राहून तिला अभिवादन केल्याचे सांगत मला स्वत:चा खूप अभिमान वाटल्याचे सेरेनाने म्हटले आहे.
नेहमी स्वत:च्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि जे योग्य आहे त्यासाठी लढा देऊन स्वत:चे 'सुपरहिरो' बना. तुम्ही एक स्त्री आहात म्हणून कधीच हार मानू नका वा पुढे पाऊल टाकायला घाबरू नका, असा सल्लाही 'सुपर सेरेना'ने तिच्या चाहत्यांना या पोस्टमधून दिला आहे.