तिरंदाजांना मीडियापासून दूर राहण्याचे संघाचे फर्मान
By Admin | Updated: October 8, 2015 04:21 IST2015-10-08T04:21:04+5:302015-10-08T04:21:04+5:30
येत्या वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या रियो आॅलिम्पिकमध्ये भारताच्या चांगल्या प्रदर्शनाचे भारतीय तिरंदाज संघावरील दडपण इतके जास्त वाढले, की त्यांनी तिरंदाजांना प्रसारमाध्यमांपासून

तिरंदाजांना मीडियापासून दूर राहण्याचे संघाचे फर्मान
- वैशाली मलेवार, नवी दिल्ली
येत्या वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या रियो आॅलिम्पिकमध्ये भारताच्या चांगल्या प्रदर्शनाचे भारतीय तिरंदाज संघावरील दडपण इतके जास्त वाढले, की त्यांनी तिरंदाजांना प्रसारमाध्यमांपासून लांब राहण्याचे तुघलकी फर्मान सुनावले आहे. यामुळे या स्पर्धेची तयारी कशा प्रकारे सुरू आहे, याची सगळी माहिती चार भितींच्या आतच आहे. याची कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू दिली जाणार नसल्याची माहिती महासंघाचे सचिव अनिल कामिनेनी यांनी ‘लोकमत’ला दिली.
ब्राझीलच्या रियो दि जानिरो शहरात २०१६मध्ये ५ आॅगस्ट ते २५ आॅगस्टपर्यंत ही स्पर्धा होईल. त्यात महिला गटात दीपिकाकुमारी, लक्ष्मीराणी मांझी आणि रीमील बुरुली यांना तिकीट टू रियो मिळालेले आहे. तसेच, पुरुष एकेरी स्पर्धेत मंगलसिंग चम्पाई यांची निवड झाली आहे. आॅलिम्पिककरिता पूर्णिमा महातो महिला तिरंदाजांना प्रशिक्षण देत आहेत. याही वेळी भारतीय तिरंदाजांनी पदक जिंकून आणावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि याच दडपणापोटी संघाने तिरंदाजांना प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याचा आदेश दिलेला आहे.
रियो आॅलिम्पिकआधी बँकॉक आणि मेक्सिको येथे तिरंदाजीची स्पर्धा होईल. त्यात आॅलिम्पिकच्या तयारीचा देखील अंदाज येईल. दीपिका या वेळी विश्व रँकिंगच्या ६व्या क्रमांकावर आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसारमाध्यमांपासून तिरंदाजांना दूर ठेवणे, हा त्यांच्या योजनेचा भाग आहे. यामुळे तिरंदाजांना दडपणापासून वाचविण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी सांगितले, की गेल्या आॅलिम्पिकआधी मीडियाच्या प्रचारामुळे दडपण वाढत गेले. त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर झाला होता.
तिरंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तिरंदाजी हा पूर्णपणे एकाग्रतेचा खेळ आहे आणि या वेळी पदक मिळेल, यांची पूर्ण आशा आहे.
- अनिल के. कामिनेनी,
सचिव, भारतीय तिरंदाज संघ