आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत बाजी मारून भारताने मालिका जिंकली. हा मोठा विजय मानू शकतो, परंतु सामन्यावर नजर टाकल्यास कळून येईल, की ही लढत खूप अटीतटीची झाली. अखेरपर्यंत सामन्यातील दबाव दिसून येत होता. भारतीय संघ विजयी लक्ष्य पार करण्यात यशस्वी होईल की नाही, अशीच चर्चा रंगलेली. १०६ धावांचे लक्ष्य तसे लहानच आहे. परंतु, हा असा सामना होता ज्यात काहीही होऊ शकत होते. पण, ज्याप्रकारे, लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी ज्याप्रकारे फलंदाजी केली ते पाहता एक गोष्ट नक्की झाली, की आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान भारतीय संघाला सहजासहजी मिळालेले नाही. खूप मेहनत घेतली आहे भारतीय खेळाडूंनी आणि या मालिकेत ती मेहनत दिसूनही आली आहे. हा एक जबरदस्त विजय आहे.त्याचवेळी, यंदाचे मोसम भारतासाठी शानदार ठरले. घरच्या मैदानावर १३ सामने खेळले गेले आणि यापैकी १० सामने जिंकले असून एकमेव पराभव पुण्यात आॅस्टे्रलियाविरुद्ध झाला. त्यामुळे माझ्या मते भारतीयांचे एक जबरदस्त अष्टपैलू प्रदर्शन झाले आहे. या मालिकेत विराट कोहलीने फारशी चमक नाही दाखवली, परंतु चेतेश्वर पुजाराने खूप धावा काढल्या. मालिकावीर ठरलेल्या रवींद्र जडेजाने फलंदाजी केली, गोलंदाजी केली तसेच उपयुक्त क्षेत्ररक्षण करून काही धावाही वाचवल्या. तसेच, केएल राहुलने एक कसोटी सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. गोलंदाजीमध्ये उमेश यादवचे जेवढे कौतुक करावे ते कमीच आहे. कारण, मालिकेत अशा खेळपट्ट्यांवर १७ बळी घेणे वेगवान गोलंदाजांसाठी कधीही सोपे नसते. एकूणच, या मालिकेत भारताची सांघिक कामगिरी राहिली आहे. रणनीतीमध्येही भारताने चांगली कामगिरी केली. अखेरच्या कसोटीमध्ये प्रत्येकी ५ गोलंदाज आणि फलंदाज खेळवले. गरजेनुसार भारतीय संघाने आपले खेळाडू बदलले. शिवाय, माझ्या मते या संपूर्ण मोसमात भारतीय खेळाडूंची जिद्द आणि त्यांचा जोश जबरदस्त होता. विजयाचा निर्धार आणि आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान राखणे हा निश्चय भारतीय खेळाडूंमध्ये दिसून येत होता. माझ्या मते या मोसमामध्ये खेळाडूंचा दृढ निश्चिय हेच सर्वात विशेष ठरले आहे. अयाझ मेमन संपादकीय सल्लागार
टीम इंडियाचे सांघिक यश
By admin | Updated: March 29, 2017 01:18 IST