बांगलादेश दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची फिटनेस टेस्ट
By Admin | Updated: May 27, 2015 01:35 IST2015-05-27T01:35:36+5:302015-05-27T01:35:36+5:30
इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या पर्वाच्या समारोपानंतर बांगलादेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.

बांगलादेश दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची फिटनेस टेस्ट
नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या पर्वाच्या समारोपानंतर बांगलादेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.
बांगलादेश दौऱ्यावर रवाना होण्यापूवी सर्व खेळाडूंची तंदुरुस्त चाचणी होणार असून, यापूर्वी दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंची फिटनेस चाचणी घेतली जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ६ जून रोजी खेळाडूंची फिटनेस चाचणी होण्याची शक्यता आहे. ठाकूर म्हणाले, ‘५ जून रोजी संघातील सर्व खेळाडू कोलकाता येथे येणार असून, एक कसोटी व ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी ७ जून रोजी भारतीय संघ बांगलादेशला रवाना होणार आहे. दौऱ्यादरम्यान खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याचा अनुभव असल्यामुळे या वेळी हे पाऊल उचलण्यात आले आहे.’
आॅस्ट्रेलियात विश्वकप स्पर्धेपूर्वी चार कसोटी व तिरंगी मालिकेदरम्यान रवींद्र जडेजा व भुवनेश्वर कुमार यांना दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागले होते. आयपीएलचे आठवे पर्व रविवारी संपले. अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले. नियमानुसार बीसीसीआयला प्रत्येक फ्रॅन्चायझीकडून खेळाडूंच्या फिटनेसबाबत माहिती मिळते; पण या वेळी प्रथमच बोर्डाने दौऱ्यावर पाठवण्यापूर्वी संघाची फिटनेस चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याआधी, सोमवारी आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी फिटनेसबाबत तक्रार असेल तर बीसीसीआयच्या सचिवांना कळवण्याचे आवाहन सर्व खेळाडूंना केलेले आहे. भारतात प्रतिभावान खेळाडूंची उणीव नसून अनेक खेळाडू संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असेही शुक्ला यांनी या वेळी सांगितले होते.
बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सचिव ठाकूर म्हणाले, ‘भारतीय संघाचे प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफच्या नियुक्तीबाबतचा निर्णय ६ जूनपर्यंत घेण्यात येईल’. (वृत्तसंस्था)